नवी दिल्ली – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी बॉम्ब ठेवल्याची माहिती समोर आली असून, दिल्लीत एकच खळबळ निर्माण झाली आहे. 100 या क्रमांकावर पंतप्रधान निवासस्थानी बॉम्ब ठेवल्याचे तब्बल 7 कॉल आले असून, तातडीने पंतप्रधान निवास्थानाला सुरक्षा यंत्रणेकडून घेरण्यात आले आहे. दरम्यान, या फोनचा दिल्ली पोलिसांनी तपास केला असून, नंबर ट्रक करून आरोपीला ताब्यात घेतलं आहे. सध्या पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
हा प्रकार 17 आणि 18 फेब्रुवारीच्या रात्री घडला आहे. पोलीस कंट्रोल रुममध्ये आलेल्या 7 कॉल्समुळे चिंतेचं वातावरण निर्माण झाले. निवासस्थानात अनेक ठिकाणी हे बॉम्ब आपण स्वतः ठेवल्याचा दावा फोन करणारा करत होता. त्यानंतर निवासस्थानी कसून शोध घेण्यात आला. बॉम्ब विरोधी पथकाने एकेक कोपरा शोधून काढला पण त्यांना देखील बॉम्ब सापडला नाही.
त्यानंतर पोलिसांनी ज्या नंबर वरून फोन आला होता तो नंबर ट्रक करत आरोपीला ताब्यात घेतलं आहे. रवींद्र तिवारी असं या व्यक्तीच नाव असून, सध्या त्याच्यावर पोलीस पुढील कारवाई करत आहेत. त्याच्या तक्रारीचे पोलीस दखल घेत नव्हते, म्हणून आपण हे पाऊल उचल्याचे या फोन कॉल करणाऱ्यांने सांगितले आहे. त्याच्या या उत्तराने पोलीस देखील चक्रावले आहेत.