पुणे – सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर पोहोचणे आवश्यक आहे. सकाळच्या सत्रात 10.30 वाजता तर दुपारच्या सत्रात दुपारी 2.30 वाजता विद्यार्थ्यांनी परीक्षा दालनात उपस्थित राहिले पाहिजे. सकाळच्या सत्रात 11 वाजता, तर दुपारच्या सत्रात दुपारी 3 वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकेचे वितरण करण्यात येणार आहे.
10 मिनिटे अधिक वेळ
परीक्षा निकोप, भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत व्हावी, यासाठी परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांनी करण्याची सुविधा यंदापासून रद्द करण्यात आली आहे. पेपरच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे वाढवून देण्यात आलेली आहेत.
कॉपीमुक्त अभियान
राज्यभरात यंदा बारावी आणि दहावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबवले जाणार आहे. यासाठी राज्य मंडळासह महसूल आणि पोलिसांच्या पथकांच्या माध्यमातून अधिक कठोरपणे हे अभियान राबवले जाणार आहे. यासाठी प्रत्येक विभागीय आयुक्तांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. त्यांच्या माध्यमातून प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्यावरही कॉपीमुक्तीची जबाबदारी देण्यात आली आहे. तर, काही ठिकाणी बैठे पथकही सज्ज असेल.
व्हिडिओ चित्रिकरण करणार
प्रश्नपत्रिका गोपनीय ठेवण्यासाठी मुख्य परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका पोहोचवणे आणि उत्तरपत्रिका आणण्यासाठी नेमलेल्या सहायक परीरक्षकांनी जीपीएस प्रणाली सुरू ठेवणे बंधनकारक सहायक परीरक्षकांनी परीक्षा कालावधीत बैठे पथक म्हणून मुख्य केंद्रावर कार्यरत रहावे आवश्यक आहे. मुख्य केंद्रावरुन प्रश्नपत्रिकेची गोपनीय पाकिटे ताब्यात घेतल्यापासून ती परीक्षा केंद्रावर पोहोचेपर्यंत व वितरीत करेपर्यंतचे व्हिडिओ चित्रिकरण मोबाइलमध्ये करावे लागणार आहे. संपूर्ण परीक्षा केंद्र परिसराचेही चित्रिकरण करण्यात येणार आहे.
271 भरारी पथके
परीक्षेत गैरप्रकारांना आळा बसावा यासाठी राज्य मंडळामार्फत 271 भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती, काही विभागीय मंडळात विशेष भरारी पथके स्थापन करण्यात आलेली आहेत. दरम्यान, परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांकडून होणारे गैरमार्ग रोखण्यासाठी विविध घटकांकडून 238 सूचना दाखल झाल्या होत्या. त्यातील नवीन केंद्रांवर सीसीटीव्ही, 50 मीटर परिसरातील झेरॉक्स दुकाने बंद यांसह अन्य सूचनांचा अवलंब केला जात आहे.