शिर्डी – शिवसेना नेमकी कुणाची, यासाठी आज शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक रामदास कदम यांनी साईबाबांच्या दरबारी साकडं घातले. धनुष्यबाण आणि शिवसेना ही शिंदे गटालाच मिळणार, असा विश्वास कदम यांनी साईबाबांच्या दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
शिर्डीत रामदास कदम यांची खदखद पुन्हा एकदा बाहेर पडल्याचे दिसून आले. मुलगा आमदार योगश कदम आणि मला राजकारणातून संपविण्याचे पाप उद्धव ठाकरे आणि अनिल परब यांनी केले, मात्र त्यांना यश आले नाही.
शिवसेना फोडण्यासाठी अनिल परब आणि उद्धव ठाकरे हेच जबाबदार आहेत, असा आरोप करून, हजार संजय कदम आणि उद्धव ठाकरे आले तरी दापोली मतदार संघातून योगेश कदमला पराभूत करू शकणार नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना फक्त दोनदा मंत्रालयात आले, खरं तर यांची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये होणे अपेक्षित आहे, असा टोला लगावला.
रामदास कदम साईबाबांचे निस्सिम भक्त आहेत. नेहमीच ते शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येत असतात. आजही ते परिवारासोबत शिर्डीला साईंच्या दर्शनासाठी आले होते. आपल्या मनातील खदखद व्यक्त करत उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले.