Rahul Dravid son Anvay Dravid – भारतीय क्रिकेट संघाचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे जगभरात लाखो चाहते आहेत. त्याच्या बचावात्मक क्रिकेट खेळण्याच्या शैलीमुळे त्यांना भारतीय संघाची भिंत म्हटले जायचे. या भिंतीला भगदाड पाडणे विरोधी संघाच्या गोलंदाजांना सहजासहजी शक्य नसायचे. त्यामुळे त्यांना ‘द वॉल’ अशी उपाधीही मिळाली. द्रविड यांनी अनेक मोक्याच्या क्षणी भारतीय संघासाठी अनमोल असे योगदान दिलेले आहे. त्यांचे हे योगदान भारतीय क्रिकेटला कधीही विसरता येणार नाही. सध्या ते भारतीय क्रिकेटचे मुख्य प्रशिक्षक अशा सर्वोच्च भूमिकेत स्वतःला सिद्ध करत आहेत. अशातच आता राहुल द्रविड यांचा धाकटा मुलगा अन्वय द्रविड चांगलाच चर्चेत आला आहे.
अन्वय द्रविड याची कर्नाटकच्या १४ वर्षांखालील संघात निवड झाली असून त्याच्याकडे संघाचे नेतृत्वदेखील सोपवण्यात आलेले आहे. त्यामुळे दिग्गज खेळाडूच्या मुलाला खेळताना बघण्यासाठी क्रिकेट चाहते उत्सुक आहेत. अन्वयची एका प्रादेशिक स्पर्धेसाठी कर्नाटकच्या १४ वर्षांखालील संघासाठी कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. राहुल द्रविड जसे भारतीय संघाचा कर्णधार आणि यष्टिरक्षक-फलंदाज होते, तसाच त्यांचा मुलगा अन्वय देखील यष्टीरक्षक-फलंदाज आहे. त्याचबरोबर त्याच्याकडे संघाचे नेतृत्व करण्याची मोठी जबाबदारी असणार आहे.
Anvay Dravid, #RahulDravid ‘s younger son to lead #Karnataka U-14 team in the inter zonal tournament (South Zone) pic.twitter.com/ynvwtbLN6G
— Manuja (@manujaveerappa) January 19, 2023
अन्वय हा एक उत्कृष्ट फलंदाज असून त्याला त्याच्या कष्टाचे फळ मिळाले आहे. तो त्याच्या वयानुसार एक चांगला फलंदाज आहे. २०२०मध्ये खेळलेल्या एका सामन्यात तो शतक झळकावण्यापासून थोडक्यात चुकला होता. परंतु बीटीआर शील्ड १४ वर्षांखालील गट १ च्या उपांत्य फेरीत त्याच्या शानदार अर्धशतकामुळे त्याने प्रसिद्धी मिळवली होती. अन्वयवर कर्णधार पदाची जबाबदारी आल्याने त्याच्याकडे आता सर्वांचे लक्ष असणार आहे. या मोठ्या भूमिकेत तो कसा खेळ दाखवतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. अन्वयचा मोठा भाऊ समित द्रविड हा देखील एक क्रिकेटपटू आहे.