सातारा – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी), पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा (आठवी) अंतिम निकाल बुधवारी सकाळी जाहीर झाला.
या परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत जिल्ह्यातील पाचवीचे 474 तर आठवीचे 473 असे 947 विद्यार्थी झळकले आहेत. शिक्षण विभागाच्यावतीने शिष्यवृत्ती परीक्षा विविध केंद्रावर घेतली होती. यामध्ये पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पाचवीसाठी 17 हजार 543 अर्ज नोंद झालेल्यापैकी 14 हजार 525 विद्यार्थी उपस्थित होते. यामधील पाच हजार 849 विद्यार्थी पात्र झाले आहेत. तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आठवीसाठी 12 हजार 788 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी बारा हजार 79 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यामधील दोन हजार 325 विद्यार्थी पात्र झाले आहेत.
तीन विद्यार्थ्यांचा राज्यात डंका
पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी) शिष्यवृत्ती परीक्षेत ग्रामीण विभागात निनाम (ता.सातारा) येथील जिल्हा परिषद शाळेची जागृती प्रमोद जाधव राज्यात प्रथम, शहरी भागात रहिमतपूरच्या वसंतदादा पाटील विद्यालयाची साईशा शशिकांत कदम राज्यात प्रथम आली. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (आठवी) शहरी विभागात सातारच्या आण्णासाहेब कल्याणी विद्यालयातील अथर्व भिमसेन पवार याने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला.