बेल्हे – साकोरी (ता. जुन्नर) येथे कुकडी डावा कालवा फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले असून दुरुस्तीचे काम प्रगती पथावर सुरू आहे. हा कालवा मंगळवारी (दि. 3) सुमारास हा कालवा अचानक फुटला. शेतकऱ्यांना सकाळी या घटनेची माहिती झाली. कालव्याच्या लगतच्या बाजुस शेती असलेल्या शेतकऱ्यांचे शेतात पाणी जाऊन शेतमालाचे प्रचंड नुकसान झालेले आहे.
अशोक घोडके यांनी अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली व कालव्याचे पाणी ताबडतोब बंद करण्याचे सांगितले. बुधवारी सकाळी तात्काळ पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. तसेच तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व तात्काळ काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
सकाळीच दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली असून लवकर काम पूर्ण होईल. शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जाऊन पिकांचे नुकसान झालेले आहे तेथे पिकांचा पंचनामा करून पीडित शेतकऱ्यांना पाटबंधारे विभागाकडून नुकसानभरपाई मिळण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.
बऱ्याच ठिकाणी कालव्याला गळती होत असल्याने सर्व दुरुस्ती व्हावी अशी ही मागणी शेतकरी करत आहेत. तसेच पुढील काळात असा प्रकार होऊ नये यासाठी चांगल्या प्रकारे कालव्याचे काम करण्यात यावे अशी अपेक्षाही शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.