लोणी काळभोर -महाराष्ट्र ही गडकिल्ल्यांनी सजलेली भूमी असून आपल्या पूर्वजांनी रक्ताचे बलिदान देऊन ऐतिहासिक गडकिल्ले बांधले आहेत. या ऐतिहासिक वास्तूंचे आपण जतन केले पाहिजे, असे मत इंदूरच्या होळकर घराण्याचे वंशज श्रीमंत भूषणसिंहराजे होळकर यांनी व्यक्त केले.
महाराजा यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेक दिन सोहळा किल्ले वाफगाव (ता. खेड, जि. पुणे) येथे 6 जानेवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर हवेली तालुक्यातील बांधवांची एक बैठक लोणी काळभोर येथे पार पडली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्रीमंत भूषणसिंहराजे होळकर बोलत होते. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे हवेली तालुका अध्यक्ष भरत गडदे, सचिव विनोद राहिंज, ग्रीन फाऊंडेशनचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय शेंडगे, साष्टे गावचे पोलीस पाटील महेश मोरे आदी उपस्थित होते.
राजे यशवंतराव होळकर हे राजे शिवछत्रपती शिवाजीमहाराज यांच्यानंतर स्वतःचा राज्याभिषेक करून घेणारे दुसरे राजे आहेत. त्यांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने 6 जानेवारी 2023 रोजी वाफगाव येथे संपूर्ण राज्यभरातुनच नाही तर इतर राज्यातूनही वेगवेगळ्या सरदार घराण्यांचे वंशज उपस्थित राहणार आहेत. आपणही हवेली तालुक्यातुन मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. विनोद राहिंज यांनी आभार मानले.
आपण परराज्यात जाऊन तेथील ऐतिहासिक स्थळांची पाहणी करतो, माहिती घेतो; परंतु आपला इतिहास आपण अभ्यासत नाही. आपण आपला इतिहास जिवंत ठेवण्यासाठी सर्वच महापुरुषांच्या ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन केले पाहिजे. महापुरुषांचे विचार, त्यांचा इतिहास लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. महाराष्ट्र शासनाने गडकिल्ले संवर्धनासाठी मोहीम राबवून आपल्या पूर्वजांच्या बलिदानांचे प्रतिक जतन करून ठेवले पाहिजे.
-श्रीमंत भूषणसिंहराजे होळकर