नववर्षाच्या पहिल्याच दिवशी बहुसंख्य लोकांना सुटी मिळाली. त्यामुळे शनिवारच्या रात्रीचा “शिणवठा’ घालवणं शक्य झालं असेल. शिवाय नववर्षाचे संकल्प (जे सामान्यतः आठ-दहा दिवस टिकतात) घट्ट करण्यासही अनेकांना मदत मिळाली असेल. महत्त्वाचं म्हणजे, वर्षभराचं आणि नंतर महिनावार राशीभविष्य वाचायलाही सर्वांना (“आमचा नाही विश्वास,’ असं म्हणणाऱ्यांसह) भरपूर वेळ मिळाला असेल.
कुणाची साडेसाती उगवत्या वर्षात संपणार असेल, तर कुणाला नव्या वर्षात ती सुरू होणार असेल. शनी कुठल्या घरात? गुरूची कृपा कितपत? राहू-केतू त्रास देतील का? कमाई किती? त्रास किती? प्रमोशनच्या शक्यता आहेत का? लग्न जमेल का? यंदा बॉसिंग किती? ग्रहस्थानांचे दुष्प्रभाव कोणकोणते? ते कमी करण्यासाठी उपाय कोणते? याची साद्यंत माहिती घ्यायला वर्षारंभी आलेला रविवार उपयुक्त ठरला असेल.
भविष्य पाहणारे फक्त आपण भारतीयच आहोत, असा विचार करून कॉम्प्लेक्स घ्यायचं काही कारण नाही. जगभरात लोक भविष्य पाहतात आणि त्यात वैयक्तिक भाकितांबरोबरच सामूहिक, जागतिक भाकितांचाही समावेश असतो. नॉस्ट्रेडॅम्सची भविष्यवाणी हे तर रेल्वे स्थानकावर सर्वाधिक खपणारं पुस्तक ठरलं असेल, याची खात्री आहे. नॉस्ट्रेडॅम्सची भविष्यवाणी सांकेतिक भाषेत असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे ज्याने जो अर्थ लावला, त्याने तो सांगितला. परंतु नॉस्ट्रेडॅम्सबरोबरच आणखी एक नाव जगभरात नेहमी चर्चेत असतं, ते म्हणजे बल्गेरियातील महिला ज्योतिषी बाबा वेंगा!
वयाच्या बाराव्या वर्षी बाबा वेंगाला अंधत्व आलं; पण त्याचबरोबर दिव्य दृष्टीही लाभली असं मानतात. वांगेलिया पांडेवा गुश्तेरोवा हे तिचं पूर्ण नाव. हिची भाकितं गूढ नसतात तर थेट असतात. 1996 मध्ये तिचा मृत्यू झाला; परंतु पुढील अनेक वर्षांसाठी तिने लिहून ठेवलेली भविष्यवाणी प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला चर्चेचा विषय ठरते. 2023 चा विचार करायचा झाल्यास, प्रयोगशाळेत बालकाचा जन्म होईल, ही प्रमुख भविष्यवाणी तिने वर्तवली आहे.
अर्थात, ते शक्य झालेलंही आहे; परंतु त्याबरोबरच प्रयोगशाळेत लोकांचा वर्ण आणि चारित्र्य ठरवता येईल, असं बाबा वेंगाने म्हटलंय ते मात्र भयानक आहे. यावर्षी एक मोठा देश जैविक हल्ला करणार आहे, हे ऐकून सगळ्यांच्या नजरा रशियाकडे वळल्यात. याखेरीज यावर्षी सौरवादळ किंवा त्सुनामी येण्याची भीतीही बाबा वेंगाने वर्तवली आहे. मानवाने संपत्ती निर्माण करण्याच्या मोहापायी निसर्गाचा जो रोष ओढवून घेतलाय, तो पाहता ही भाकितं वर्तवली नसती तरी तो धोका होताच, असं अनेकांचं म्हणणं आहे. ऑस्ट्रेलियात सरत्या वर्षात महापूर आला होता तो निसर्गाची अवहेलना केल्यामुळेच; पण तरीही चर्चा झाली ती बाबा वेंगा यांच्या अचूक भाकिताचीच!
यावर्षी जगभरात अंधार पसरेल, एलियन्स पृथ्वीवर हल्ला करतील, त्यात लाखो लोक मरतील, अणुऊर्जा प्रकल्पाचा स्फोट होऊ शकतो, हे यावर्षीचे हायलाइट्स आहेत. फॅण्टसी वाटणाऱ्या कितीतरी गोष्टी खरोखर घडत गेल्यामुळे यासुद्धा हॉलिवूडकल्पना वाटत नाहीत. त्यामुळे आपल्या राशीला कितीही बरकत सांगितली असली, तरी आपलं अस्तित्व जगाच्या अस्तित्वावर अवलंबून आहे आणि जगाचं भवितव्य बाबा वेंगानं सांगितल्यामुळे नव्हे तर आपल्याच कारनाम्यांमुळे धोक्यात आलंय, हे स्वीकारून नव्या वर्षात थोडंतरी सुधारूया राव!
हिमांशू