नागपूर – आम्ही सूडाचे राजकारण करत आहोत असा आरोप आमच्यावर केला जातो आहे. मात्र अभिनेत्री कंगना रणावत आणि नवनीत राणा यांच्याबाबत काय झाले? महाविकास आघाडी सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही गोवण्याचा प्रयत्न झाला असे आरोप करत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विरोधी पक्षांच्या आघाडीला लक्ष्य केले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जे बोलायचे ते करायचे. मात्र त्यांच्या पुत्राने व्हिडिओ संदेश देऊनही विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला नाही अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी शिवसेना नेते उध्दव ठाकरे यांना लक्ष्य केले. उध्दव ठाकरे यांनी कालच परिषदेत आणि नंतर बोलताना शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली होती.
दरम्यान, अलिकडेच राज्यात महापुरूषांच्या संदर्भात अवमानजनक वक्तव्ये करण्याची लाट उसळली आहे. त्यावरून थेट राज्यपाल आणि राज्य सरकारलाही आरोपींच्या पिंजऱ्यात उभे राहावे लागले आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर थोर पुरूषांच्या विरोधात अपमानजनक विधाने करणाऱ्यांच्या विरोधात कायदा आणला जाणार असल्याचे शिंदे यांनी जाहीर केले.