मुंबई – काल सोमवार दि. 19 डिसेंबरपासून नागपूर येथे राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरु झालं आहे. करोना संकटानंतरचं नागपूरमध्ये होणारं हे पहिलंच अधिवेशन आहे. या अधिवेशनाचे नियोजन जवळपास 14 दिवसांचे आहे. मात्र 24, 25 डिसेंबर अनुक्रमे शनिवारी, रविवार असल्याने कामकाजास सुट्टी असेल, तर पुढे 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी रोजी देखील रविवार, शनिवार असल्याने कामकाजास सुट्टी असेल. त्यामुळे एकूण 10 दिवस दोन्ही सभागृहांचे नियोजित कामकाज पार पडेल. आज या अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे.
मात्र, अधिवेशन काळातच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहलं आहे. सध्या त्यांचं हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत असून, अनेकांनी यावर आपली प्रतिक्रिया देखील देण्यास सुरुवात केली आहे. यात त्यांनी महात्मा फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि त्यांच्या सहकारी फातिमा शेख यांनी पुण्यात सुरु केलेल्या मुलींच्या पहिल्या शाळेची वास्तू असलेल्या भिडेवाड्याची दूरवस्था झाल्याने निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे.
महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि त्यांच्या सहकारी फातिमा शेख यांनी पुण्यात सुरु केलेल्या मुलींच्या पहिल्या शाळेची वास्तू असलेल्या भिडेवाड्याची दूरवस्था झाली आहे. स्त्री शिक्षणाचा पाया ज्या वास्तूत रचला तिची दूरवस्था होणं, हे योग्य नाही. pic.twitter.com/MJNCQpZIpH
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 20, 2022
रोहित पवार आपल्या पत्रात म्हणतात….
रोहित राजेंद्र पवार सदस्य महाराष्ट्र विधानसभा,
विषय :- महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात सुरू केलल्या पहिल्या मुलींच्या शाळेची वास्तु असणारा भिडेवाडा या राष्ट्रीय स्मारकाच्या संवर्धन व विकासाकरीता निधी उपलब्ध होणेबाबत. उपरोक्त विषयान्वये 1 जानेवारी 1848 साली महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि त्यांच्या सहकारी फातिमा शेख यांनी भिडे वाडयात मुलींची पहिली शाळा सुरू केली. महात्मा फुलेच्या कार्यकर्तुत्वाने शिक्षण घेण्याची संधी महिलांना मिळाली आणि त्यामुळेच आज स्त्रिया शिक्षण घेउन आपल्या पायावर उभ्या राहिल्या आहेत.
आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांनी प्रगती केली आहे. पण स्त्री शिक्षणाचा साक्षीदार असलेला भिडे वाडयाची मात्र दुरावस्था झालेली आहे. बुधवार पेठेतील हा वाडा गेली कित्येक वर्षापासून अखेरचा घटका मोजत असून शासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. ज्या वाडयात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पहिली मुलीची शाळा काढली, जिथे स्त्री शिक्षणाचा पाया रचला गेला. मुली शिकून आपल्या पायावर उभ्या राहिल्या. त्या वास्तुची आजची अवस्था दुर्देवाने फार खराब आहे.
सदर ठिकाणी पुन्हा गरीब मुलीसाठी शाळा सुरू होणेबाबत जनसामान्यातून मागणी होत आहे. तरी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात सुरू केलेल्या पहिल्या मुलींच्या शाळेची वास्तू असणारा भिडेवाडा या राष्ट्रीय स्मारकाच्या संवर्धन व विकासाकरीता निधी उपलब्ध करून पुन्हा मुलीसाठी शाळा सुरू करण्यात यावी, ही विनंती.” या आशयाचे पत्र त्यांनी लिहलं आहे.