जॅकसन (अमेरिका) – अमेरिकेतील ल्युसियाना आणि मिसिसीपी प्रांतांमधील अनेक शहरांना मंगळवारी संध्याकाळी जोरदार वादळाचा तडाखा बसला आहे. या वादळाचे रुपांतर चक्रिवादळामध्ये होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून अतिदक्षिणेकडील भागात या वादळामुळे हवामान अत्यंत खराब होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मंगळवार सकाळपासूनच या राज्यांमध्ये जोरदार वादळाचे अनेक इशारे देण्यात आले होते. मात्र या वादळामुळे कोठेही जीवित अथवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. वादळामुळे पूर्व टेक्सासपासून जॉर्जियापर्यंत आणि अति उत्तरेकडील इंडियाना प्रांतापर्यंत अनेक ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला.
हे वादळ मिसिसीपी प्रांतात काल संध्याकाळी जमिनीवर थडकल्याचे नॅशनल वेदर सर्व्हिसने म्हटले आहे. हे वादळ नंतर अल्बामा प्रांतात थडकणार असल्याचा अंदाज देखील व्यक्त करण्यात आला होता.या प्रचंड वादळाचा फटका तब्बल 25 दशलक्ष लोकांना बसण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
टेनेसी प्रांतातील न्यू ओर्लियन्स, मेंफीज आणि नॅशविले आणि बर्मिंगहॅम आणि अल्बामा या शहरांना या वादळाचा मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. अनेक भागांमध्ये मुसळधार पावसासह मोठ्या गारा पडण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली आहे.