पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातले आदर्श आहेत. तसेच नितीन गडकरी आणि शरद पवारांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केली होती. त्या वक्तव्यावरून पुन्हा एकदा राज्यभरात त्यांचे तीव्र पडसाद उमटताना दिसून येत आहेत. विरोधकांकडून राज्यपालांवर सडकून टीका होत असून त्यांची राज्यातून हकालपट्टी कारण्यातची मागणी देखील करण्यात येत आहे. दरम्यान पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी संदीप काळे यांनी शहरातील विविध ठिकाणी बॅनर लावून राज्यपालांच्या त्या विधानाचा निषेध नोंदविला आहे.
संदीप काळे यांनी लावलेल्या बॅनरमध्ये “आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श होते, आहेत आणि राहणारच……उतरत्या वयात धोत्रात घाण करण्यासारखे विषारी वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा निषेध, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच धोतर फाडणार्यास किंवा फेडणार्यास १ लाख रोख रक्कम दिली जाईल” अशी टीप या फ्लेक्सवर लिहिण्यात आली.
राष्ट्रवादीकडून लावण्यात आलेल्या या बॅनरची शहरासह सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, भगतसिंह कोश्यारी यांनी नितीन गडकरी आणि शरद पवारांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केली. इतकंच नव्हे, तर शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श असल्याचे विधान राज्यपालांनी केले होते. त्यांच्या या विधानाचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.