कात्रज, दि. 19 (प्रतिनिधी) – पुणे शहराला 2023च्या स्वच्छ सर्वेक्षण मध्ये प्रथम क्रमांकावर येण्यासाठी कोंढवा-येवलेवाडी कार्यालयाकडून ज्या पद्धतीने पुढाकार घेऊन नागरिकांच्या सहभागाने विविध कार्यक्रम राबविले जात आहेत. यामुळे निश्चितच पुणे शहर स्वच्छतेत प्रथम क्रमांकावर येईल, असा विश्वास आरोग्य विभागासह क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
पुणे महानगरपालिकेच्या “स्वच्छ सर्वेक्षण 2023′ पूर्वतयारी निमित्त कर्मचारी व अधिकारी यांची कार्यक्षमता वाढविण्याकरिता कोंढवा-येवलेवाडी सहाय्यक आयुक्त कार्यालयातर्फे “आदर्श कोठी स्वच्छ प्रभाग स्पर्धा’ घेण्यात आली. याचे परीक्षण दि. 4 ते 8 नोव्हेंबर 2022 या कालावधीत करण्यात आले. याचा पारितोषिक वितरण समारंभ अण्णाभाऊ साठे सभागृह या ठिकाणी पार पडला.
सहाय्यक आयुक्त डॉ. ज्योती धोत्रे, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. केतकी घाटगे, घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त आशा राऊत, परिमंडळ क्र. 4 विभागाचे उपायुक्त संदीप कदम उपस्थित होते.
आदर्श कोठी स्वच्छ प्रभाग स्पर्धा प्रथम क्रमांक चैत्रवन “अ’आरोग्य कोठी, द्वितीय – राजस आरोग्य कोठी, कार्यक्षम आरोग्य निरीक्षक प्रथम क्रमांक उमेश ठोंबरे, द्वितीय- प्रशांत कर्णे, कार्यक्षम मोकादम प्रथम क्रमांक – सुनील चव्हाण यांना मिळाला. संयोजन वरिष्ठ आरोग्य निरीक्षक मंगलदास माने यांनी केले..