पिंपरी, दि. 16 (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य विभागाने 2022-23 या आर्थिक वर्षांतील साडेसात महिन्यात तब्बल पावणे आठशे कोटी रुपयांचा निधी खर्च केला आहे. म्हणजे 60 टक्के निधी खर्च झाला असून प्रशासकीय राजवटीतही विकास कामे जोरात असल्याचे दिसून येत आहे.
महापालिकेचे सुमारे सहा हजार कोटी रूपयांचे वार्षिक बजेट आहे. यामध्ये सर्वाधिक बजेट हे महापालिकेच्या स्थापत्य विभागाला असून बाराशे कोटी 96 लाख रूपयांची तरतूद आहे. या विभागामार्फत शहरातील आठही क्षेत्रीय कार्यालायाअंतर्गत स्थापत्य विषयक कामे केली जातात. या कामांमध्ये उड्डाणपूल, व्यवसायिक गाळे, आवश्यक असेल तेथे नाट्यगृहे, प्रेक्षागृहे, वाचनालये, रस्ते, उद्यानातील स्थापत्य विषयक कामे, क्रीडा विभागाअंतर्गत जलतरण तलावाची दुरूस्तीची कामे यासह विविध दुरूस्ती विषयक कामे केली जातात.
12 मार्च 2022 रोजी महापालिकेतील लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपून प्रशासकीय राजवट सुरू झाली आहे. महापालिका आयुक्त शेखर सिंह प्रशासक म्हणून कामकाज पाहत आहेत. लोकप्रतिनिधी असताना शहराच्या विविध भागातील नगरसेवक आपल्या प्रभागातील विविध विकास कामे सुचवून ते स्थायी समिती, सर्वसाधारण सभेतून मंजूर करून घेत होते. महापालिकेत आठ महिन्यांपासून प्रशासकीय राजवट सुरू असताना शहरातील विविध भागातील विकास कामांवर कोट्यावधी रूपयांचा खर्च करण्यात येत आहे. दर आठवड्याला प्रशासकांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची बैठक होत असून गरजेनुसार सर्वसाधारण सभाही घेतली जात आहे. स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेत शहर विकासाच्या आणि शहराच्या गरजेनुसार विविध कोट्यावधी रूपयांची नवीन कामेही मंजूर करण्यात येत आहेत. त्यामुळेच लोकप्रतिनिधी नसतानाही स्थापत्य विभागाने 2022-23 या आर्थिक वर्षांतील साडेसात महिन्यात 60.57 टक्के निधी खर्च केला आहे. तब्बल 786 कोटी 14 लाख रूपयांचा निधी विविध विकास कामांवर खर्च केला आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी नसतानाही शहर विकासाला कोणत्याच प्रकारची खीळ बसली नसल्याचे यावरून दिसून येत आहे.
2022-23 या आर्थिक वर्षांतील साडेसात महिन्यात स्थापत्य विभागाकडून विविध विकास कामांवर 786 कोटी 14 लाख रूपयांचा खर्च करण्यात आला आहे. स्थापत्य विभागामार्फत विविध विकास कामे केली जात आहेत.
– मकरंद निकम, शहर अभियंता