राहुरी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्याप्रकरणी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे.नगर पोलिसांनी या विद्यार्थ्यावर कारवाई केली असून, मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या विद्यार्थ्यास न्यायालयात हजर करण्यात आले असून त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
गणेश नारायण गोटे (वय 29) असे अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. त्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महिला खासदार, महिला पत्रकार यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते. त्यानंतर महाराष्ट्र सायबर पोलिसांनी शनिवारी गोटे याला अटक केली. आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्याप्रकरणी दि. 14 ऑक्टोबर रोजी सायबरकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर सायबर पोलिसांनी याचा तपास सुरू केला.
महाराष्ट्र सायबर पोलिसांनी तांत्रिक पुराव्याच्या आधारे महात्मा फुले कृषी विद्यापीठात शुक्रवारी धाड टाकून दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यानंतर शनिवारी गणेश गोटे याला अटक केली. तपासात दोन मोबाईल, एक लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. त्याचे तांत्रिक विश्लेषण करून प्रसारित केलेला मचकूर आणखी कोणाकडून तयार करून घेतला आहे का हे तपासण्यात येणार आहे. न्यायालयाने गोटे याला दि. 2 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. महाराष्ट्र सायबर सेलचे पोलीस निरीक्षक संजय शिंदे हे अधिक तपास करीत आहे. या विद्यार्थ्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व महिला पोलिसांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल त्याची कसून चौकशी चालू आहे.