कोलकाता – विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांच्या मतदारसंघातील मेदिनापूर जिल्ह्यातील नंदीग्राम येथील सहकारी संस्थेच्या निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवला आहे. भाजपने 12 पैकी 11 जागा जिंकल्या असून केवळ एकच जागा टीएमसीच्या भेकुटिया समबे कृषी समितीला जिंकता आली.
रविवारी झालेल्या या निवडणुकीदम्यान मतदान केंद्रावर दोन गटात धक्काबुक्कीही झाली. भाजपच्या एका विजयी उमेदवाराने आरोप केला आहे की, मतदानात व्यत्यय आणण्यासाठी टीएमसीने बाहेरील लोकांना आणून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, मात्र मतदारांनी त्यांचा हा गेमप्लॅन हाणून पाडला.
दरम्यान, पश्चिम बंगालमधील नंदीग्राम मतदारसंघाला विशेष महत्व आहे. 2021 च्या विधानसभा निवडणुकीत याठिकाणी तृणमूल काॅंग्रेसच्या उमेदवार मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विरूद्ध त्यांचे एकेकाळचे सहकारी भाजपचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांच्यात चुरशीची लढत झाली होती. यावेळी सुवेंदू अधिकारी यांनी तब्बल 1736 मतांनी ममता बॅनर्जी यांचा पराभव केला होता. त्यानंतर आता झालेल्या सहकारी संस्थेच्या निवडणुकीतही अधिकारी यांनी ममता बॅनर्जींना मोठा धक्का दिलाय.