मुंबई – मुंबईतील लालबागचा राजा हा गणपती महाराष्ट्रातील तमाम गणेश भक्तांचे श्रद्धास्थान आहे आणि गणेशोत्सवाच्या काळात या गणपतीच्या चरणी अनेक प्रकारच्या वस्तू व सोन्या-चांदीचे दागिने दान केले जात असतात. उत्सव संपल्यानंतर या मोैल्यवान वस्तूंचा लिलाव केला जातो. यंदा या लिलावातून एकूण 1 कोटी 25 लाख रुपयांची रक्कम उभी राहिली असून या संपूर्ण उत्सवात या मंडळाला एकूण सहा कोटी 25 लाख रुपये मिळाले आहेत, अशी माहिती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब साळवे यांनी सांगितले की, या गणपतीला ज्या वस्तू दान केल्या गेल्या होत्या त्यातील सर्वात मोैल्यवान वस्तूत गणपतीला अर्पण करण्यात आलेला सव्वा किलो वजनाच्या सोन्याच्या मोदकाचा समावेश होता. हा मोदक लिलावात 60 लाख 3 हजार रुपयांना विकला गेला. एका सोन्याच्या मोठ्या हाराला 8 लाख 55 हजारांची किंमत मिळाली. एक किलो सोन्याच्या बिस्कीटाला 5 लाख 77 हजार रुपये मिळाले.
हेही वाचा – गौतम अदानी बनले जगातले दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती; “एवढी’ झाली संपत्ती
यंदाच्या उत्सवात एक नवी दुचाकीही राजाच्या चरणी अर्पण करण्यात आली होती. त्याच्या विक्रीतून 77 हजार रुपये मिळाले आहेत. याखेरीज सोन्या चांदीच्या असंख्य लहान मोठ्या वस्तू राजाच्या चरणी अर्पण केल्या गेल्या होत्या. त्या बहुतांश वस्तूंचा लिलाव काल करण्यात आला. या दानात अंदाजे साडेपाच किलो सोने आणि 60 किलो चांदीचे दान भक्तांनी अर्पण केले आहे. सन 2008 साली या गणपतीला 75 वर्षे पूर्ण झाली होती, त्या वर्षी गणपतीच्या चरणी साडेअकरा कोटी रुपयांचे दान जमा झाले होते.