मुंबई – महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांनी घडवून आणलेल्या राजकीय भूकंपाची कंपने अद्यापही सुरूच आहेत. शिंदे यांच्या बंडामुळे उद्धव ठाकरे यांना सत्ता तर गमवावी लागलीच मात्र त्यासोबतच पक्षातील त्यांचे स्थान देखील डळमळीत झाले. उद्धव ठाकरे सध्या उरलेला पक्ष वाचवण्यासाठी झटताना दिसतायेत. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे सद्य राजकीय परिस्थितीत आपल्या पक्षवाढीची संधी शोधतायेत. राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर शिवसेनेवर सातत्याने हिंदुत्वाशी तडजोड केल्याचे आरोप झाले. शिंदे व त्यांच्या बंडखोर आमदारही बंडामागे काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत असताना ‘हिंदुत्वाच्या विचाराची प्रतारणा’ होत असल्याचा आरोप सातत्याने करतायेत.
मात्र सेना राष्ट्रवादी व काँग्रेससोबत सत्तेत असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सेनेची दुखती नस ओळखत भगव्यावर दावा सांगितला होता. यासाठी त्यांनी पक्षाच्या झेंड्याची आणि अजेंड्याची हिंदुत्वाशी सांगड घातली. मविआ सत्तेत असतानाच राज ठाकरे यांनी राज्यभरात मशिदीवरील भोंग्यांविरोधात आंदोलन छेडत शिवसेनेने स्वीकरलेल्या सॉफ्ट हिंदुत्वाला टार्गेट केले होते. याचाच दुसरा अध्याय आता राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्यात पाहायला मिळणार आहे. ( Raj Thackeray Vidharbha Daura )
ठाकरे यांच्यावर झालेल्या ‘हिप बोन’ सर्जरीनंतर ते लवकरच मैदानात उतरणार आहेत. गणेशोस्तवानंतर नियोजित असलेला ठाकरे यांचा हा दौरा विदर्भात जाणार आहे. विदर्भात सेनेचा मतदार मोठ्या संख्येने आहे. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सत्तेत जाण्याचा घेतलेला निर्णय व त्यानंतर शिंदे गटाने ठाकरे ब्रँड नाकारण्याची घेतलेली भूमिका या दोन्हींमुळे नवा पर्याय स्वीकारण्याची शक्यता असलेल्या मतदाराची ‘नाराजी ट्रॅप’ करण्याचा प्रयत्न राज ठाकरे करतील. भाजपकडे सहजासहजी न जाणारा मतदार आपल्याकडे ओढण्याचा राज ठाकरे यांचा प्रयत्न असेल.
येत्या १३ तारखेपासून राज ठाकरे हे नागपूर जिल्हा दौऱ्यावर जाणार आहेत. येथे ते पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतील. ठाकरेंच्या मिशन विदर्भपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात भेट झाली आहे. राज ठाकरे व भाजप नेत्यांच्या वाढत्या भेटीगाठींमागे नव्या राजकीय समीकरणांची चाचपणी तर नाही ना अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. मात्र अद्याप मनसे-भाजप एकत्र येणार असल्यावर दोन्ही बाजूच्या नेत्यांनी शिक्कामोर्तब केलेले नाही.
दरम्यान, शिंदे यांच्या बंडामागे भाजप असून त्यांना शिवसेना संपवायची असल्याचा आरोप उद्धव ठाकरे सातत्याने करतायेत. अशात ठाकरे ब्रँडमागे उभे असलेले मतदार राज ठाकरेंना सोबत घेऊन आपल्याकडे ओढण्याचा भाजपचा प्रयत्न असेल असेही बोलले जात आहे. ( Raj Thackeray Vidharbha Daura )