सेऊल, (दक्षिण कोरिया) – उत्तर कोरियाने आज लघुपल्ल्याच्या 8 क्षेपणास्त्रांची एकाचवेळी चाचणी घेतली आहे. ही क्षेपणास्त्रे अण्वस्त्र वाहून नेण्याच्या क्षमतेची असावीत, असा अंदाज अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
उत्तर कोरियातकडून प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली गेली असावी. राजधानी प्योंगयोंगजवळच्या सुनान भागातून 35 मिनिटांच्या अवधीमध्ये या सर्व क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली गेली, असे दक्षिण कोरियाच्या लष्कराच्या सह प्रमुखांनी म्हटले आहे. ही क्षेपणास्त्रे किती लांबपर्यंत गेली हे दक्षिण कोरियाने सांगितलेले नाही. मात्र ही क्षेपणास्त्रे अधिक उंचावर गेल्याचे निदर्शनास आल्याचे नमूद केले आहे.
अमेरिकेच्या रोनाल्ड रेगन या विमानवाहू नौकेने दक्षिण कोरियाबरोबर फिलीपाईन्सच्या समुद्रात तीन दिवसांचा युद्धसराव केला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी उत्तर कोरियाने या क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली आहे.
दक्षिण कोरियाचे अध्यक्ष यून सुक येओल यांनी या चाचण्यांची गंभीर दखल घेतली असून आपल्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची तातडीची बैठक बोलावली आहे. जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांनीही या चाचण्यांबाबत अधिक माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
उत्तर कोरियाने या वर्षी घेतेली ही 18 वी क्षेपणास्त्र चाचणी आहे. या वर्षात घेतेल्या चाचण्यांमध्ये आंतरखंडीय क्षेपणास्त्राच्या चाचणीचाही समावेश आहे.