नवी दिल्ली – सुप्रसिद्ध बॉलीवूड गायक केके उर्फ कृष्णकुमार कुन्नाथ यांचं 31 मे रोजी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशात हळहळ व्यक्त कऱण्यात येत आहे. केके यांना हार्ट ब्लॉकेजची समस्या होती, अशी माहिती समोर आली आहे.
एका एजन्सीला शवविच्छेदन अहवालाची माहिती देताना डॉक्टर म्हणाले, “केकेच्या डाव्या कोरोनरी आर्टरीमध्ये खूप ब्लॉकेज होते. बाकीच्या धमन्या आणि सब-आर्टरीजमध्ये ब्लॉकेज आढळले आहेत. लाईव्ह शोमध्ये परफॉर्म करताना, केकेच्या धमन्यांमधून रक्त वाहणे बंद झाले, त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे डॉक्टरांनी म्हटलं.
दरम्यान हृदयविकाराचा झटका आला त्यावेळी केके यांना सीपीआर (कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन) दिले असते तर त्यांचे प्राण वाचू शकले असते, असंही डॉक्टरांनी नमूद केलं. केके यांना अनेक दिवसांपासून हृदयविकाराचा त्रास होता. मात्र त्यांना हे माहित नव्हतं.
कोलकाता येथील नजरुल स्टेजवर परफॉर्म करत असताना केके यांची तब्येत अचानक बिघडू लागली. त्यानंतर त्यांना हॉटेलच्या खोलीत नेण्यात आले. कोणतीही सुधारणा न झाल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र वाटेतच केके यांचा मृत्यू झाला.