सूर, लय आणि ताल यांच्या सुरेख त्रिवेणी संगमाने चित्रपटाला तसेच गीताला उंचीवर नेऊन ठेवणारे भारतीय हिंदी चित्रपट उद्योगातील गायक, संगीत निर्माता ओ. पी. नय्यर (ओंकार प्रसाद नय्यर) यांचा आज जन्मदिन.
नय्यर यांचा जन्म सध्याच्या पाकिस्तानमधील लाहोर येथे झाला. लाहोर येथेच त्यांनी संगीताचे प्रशिक्षण घेतले. भारताच्या फाळणीनंतर त्यांचे संपूर्ण कुटुंब लाहोर सोडून अमृतसरला आले. त्यांनी संगीताची सेवा करण्यासाठी आपले शिक्षण अर्धवट सोडले. ऑल इंडिया रेडिओमधून त्यांचा सांगीतिक प्रवास सुरू झाला. काही काळासाठी ऑल इंडिया रेडिओने त्यांनी संगीत दिलेल्या गाण्यावर बंदी घातली होती. त्यांची गाणी रेडिओ सिलोनवर प्रसारित होऊ लागली.अखेर आकाशवाणीने बंदी उठवली.
नय्यर यांचा शास्त्रीय संगीतातील पिलू हा आवडता राग होता. त्यांनी प्रथम वर्ष 1949 मध्ये कनीज या चित्रपटासाठी पार्श्वसंगीत तयार केले होते. मात्र संगीत दिग्दर्शक म्हणून त्यांची ओळख देणारा दलसुख एम. पांचोली निर्मित वर्ष 1952 मधील आकाश हा त्यांचा पहिला चित्रपट होता. त्यानंतर नय्यर यांनी छम छमा छम आणि बाज या चित्रपटासाठी संगीत दिले. हे चित्रपट देखील प्रदर्शित झाले परंतु या चित्रपटांच्या अपयशामुळे त्यांना खूप मोठा धक्का बसला आणि त्यांनी चित्रपट उद्योग सोडून अमृतसरला परत जाण्याचा निर्णय घेतला.
त्यावेळी वर्ष 1953 मधे पार्श्वगायिका गीता दत्त यांनी ओ. पी. नय्यर यांना गुरूदत्त यांना भेटण्याचा सल्ला दिला.
वर्ष 1954 मध्ये गुरुदत्त यांनी स्वतःची निर्मिती संस्था स्थापन केली आणि त्यांच्या ‘आरपार’ या चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी ओ. पी. नय्यर यांच्यावर सोपविली. या चित्रपटातील गाणी सुपरहिट झाली आणि त्यांनी घरी जाण्याचा बेत सोडला. गुरूदत्त यांनी त्यांना ‘मिस्टर अँड मिसेस’ आणि ‘सीआयडी’साठी संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी सोपविली.
हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त नय्यर यांनी वर्ष 1989 मधे तेलुगूमधील ‘नीरजनम’ या चित्रपटासाठी संगीत दिले. साधारण 1960च्या सुमारास थोडी मंदी आली होती. मात्र वर्ष 1962 मध्ये त्यांनी ‘एक मुसाफिर एक हसीना’ या चित्रपटाद्वारे शानदार पुनरागमन केले. त्याच दशकात त्यांनी ‘फिर वही दिल लाया हूं’, ‘कश्मीर की कली’ या चित्रपटांच्या संगीताने पुनरागमन केले.
गीता दत्त, आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्यासोबत त्यांनी सर्वाधिक काम केले. मोहम्मद रफीपासून वेगळे झाल्यानंतर ओपी यांनी महेंद्र कपूरसोबत काम करण्यास सुरुवात केली. ओपींनी आशा भोसले यांच्यासोबत सुमारे सत्तर चित्रपटांमध्ये काम केले. ‘कजरा मोहब्बत वाला’, ‘दीवाना हुआ बादल’, ‘एक परदेसी मेरा दिल ले गया’, ‘आये मेहेरबान’, त्यांनी संगीतबद्ध केले. ‘जब जुल्फे तेरी’, ‘तौबा ये मतवाली चाल’ सारखी सर्व गाणी आणि ती आजही लोकप्रिय आहेत. नय्यर यांचे 28 जानेवारी 2007 रोजी निधन झाले.