पिंपरी -औद्योगिक परिसरात वाढलेल्या चोऱ्यांना आळा घालून अट्टल गुन्हेगारांवर कायमस्वरूपी प्रतिबंधात्मक उपाय करण्यात येईल, असे अश्वासन देऊन उद्योजकांच्या सर्व समस्या मार्गी लावण्यात येईल, असे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सांगितले. ही माहिती पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेच्या वतीने अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी दिली.
एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशनच्या वतीने औद्योगिक परिसरातील विविध औद्योगिक संघटना व वाहतूक संघटना यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी पोलीस आयुक्त शिंदे यांच्यासोबत चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक आयुक्त सागर कवडे, भोसरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील तसेच पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या वतीने अध्यक्ष संदीप बेलसरे, संचालक संजय सातव, विजय खळदकर, प्रमोद राणे, विनोद मित्तल तसेच स्वीकृत संचालक सुनील शिंदे, माणिक पडवळ, अनिल कांकरिया, राजू देशपांडे, विजय भिलवडे, रमेश होले, सचिन पाटील उपस्थित होते.
सीसीटीव्ही फुटेज देऊनही तपास नाही
संदीप बेलसरे यांनी उद्योजकांना जाणवत असलेल्या विविध समस्या मांडल्या. पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरातील तळवडे, सोनवणेवस्ती, कुदळवाडी, चिखली, शांतीनगर, प्राधिकरण सेक्टर 7 व 10 च एमआयडीसी भोसरी, पिंपरी, चिंचवड या औद्योगिक परिसरात चोऱ्याचे प्रमाणात वाढ झाली आहे. औद्योगिक परिसरातील बहुतांश उद्योजकांनी सीसीटीव्ही बसविलेले आहेत. चोरी झाल्यानंतर संबधित पोलीस स्टेशनला सीसीटीव्ही फुटेज देऊनही तपास लागलेला नाही. तसेच औद्योगिक परिसरात चोऱ्या करणाऱ्या गुन्हेगारांची नोंद असलेल्यांवर कायमस्वरूपी कडक प्रतिबंधात्मक कारवाई करावी.
माथाडी संघटनांचा त्रास
लघुउद्योग हे माथाडी कामगार कायद्याच्या कक्षेत येत नसतांनाही औद्योगिक परिसरात स्वयंघोषित अनाधिकृत माथाडी कामगार संघटना उद्योजकांना नाहक त्रास देतात. औद्योगिक परिसरातील चोरीला गेलेले भंगार हे त्या परिसरातील अनाधिकृत भंगार खरेदी करणाऱ्या दुकानातच विकले जाते. त्यांच्यावर कायमस्वरूपी कारवाई करावी. तळवडे व चिखली औद्योगिक परिसरात सकाळी व संध्याकाळी मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. कंपन्या चालू होण्याच्या व कंपन्या सुटण्याच्या वेळेस वाहतूक कोंडी टाळण्यासाठी योग्य ते पोलीस बळ उपलब्ध करून द्यावे, आदींवर चर्चा करण्यात आली.
===================