मुंबई – देश-विदेशातील सरकारनी क्रिप्टो करन्सीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले असतानाच गेल्या सहा महिन्यांपासून विविध क्रिप्टो करन्सीचे दर वेगाने कोसळत आहेत. सहा महिन्यात क्रिप्टोचे एकूण मूल्य तीन लाख कोटी डॉलरवरून दीड लाख कोटी डॉलरवर आले आहे. त्यामुळे देश-विदेशातील क्रिप्टो करन्सीत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
डावोस येथे या विषयावर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या उपव्यवस्थापकीय संचालक गीता गोपीनाथन यांनी वक्तव्य केले. त्या म्हणाल्या की क्रिप्टो करन्सी भयंकर जोखमीचे गुंतवणूक साधन ठरू लागले आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांची गुंतवणूक सुरक्षित राहावी याकरिता यावर नियंत्रणाची गरज असल्याचे आपल्याला वाटते. आपण स्वतः क्रिप्टो करन्सीपासून कायम दूर रहात आलो आहोत असे त्यांनी सांगितले.
भारत सरकारचा क्रिप्टोला सध्याच्या स्वरूपामध्ये तीव्र विरोध आहे. त्यामुळेच भारत सरकारने या करन्सीवर मोठ्या प्रमाणात कर आकारणी केली आहे. अर्थसंकल्पामध्ये क्रिप्टो मधील उत्पन्नावर मोठा कर लागला आहे. त्याचबरोबर टीडीएस लावण्यात येत आहे. आता पुन्हा या व्यवहारावर जीएसटी लावण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
गोपीनाथन यांनी सांगितले की करोना आणि रशिया- युक्रेन युद्धामुळे जागतिक विकास दराबरोबरच भारतीय विकास दरावर नकारात्मक परिणाम होणार आहे. चीनमध्ये कोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर चीनचा विकास दर कमी होणार आहे. त्याचा परिणाम भारताबरोबरच इतर देशावर होणार असल्याचे त्यांनी सांगितले.