न्यूयॉर्क – संजय दत्तच्या मुन्नाभाई या चित्रपटामध्ये जादू की झप्पी हा शब्दप्रयोग लोकप्रिय झाला. एखाद्या माणसाचा ताणतणाव कमी करण्यासाठी त्याला मिठीत घेणे हा जादू की झप्पी या शब्दप्रयोगाचा अर्थ होता. आता एका नवीन संशोधनाप्रमाणे जादू की झप्पी खरंच फायदेशीर ठरत आहे.
मानसिक तणावाखाली वावरत असणाऱ्या माणसाला त्याच्या एखाद्या जवळच्या माणसाने आलिंगन दिले तर त्याचा ताण कमी होतो आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, असे या संशोधनातून सिद्ध झाले आहे. अमेरिकेत ऍरिझोना विद्यापीठांमध्ये याबाबतचे संशोधन झाले असून एकूण 76 लोकांचा अभ्यास यामध्ये करण्यात आला. अशा जादू की झप्पीचा जास्त फायदा महिलांना होतो असेही या संशोधनातून सिद्ध झाले आहे.
नकारात्मक वातावरणात वावरणाऱ्या एखाद्या महिलेला तिच्या एखाद्या जवळच्या महिलेने जर आलिंगन दिले तर तिला सकारात्मक ऊर्जा मिळते आणि मनातील नकारात्मक विषय बाजूला जातात असेही या संशोधनातून समोर आले आहे.
व्यक्तीचा मानसिक ताणतणाव वाढण्यासाठी कॉर्टिसॉल नावाचा एक हार्मोन जबाबदार असतो जेव्हा मानसिक ताण तणावाखाली वावरणाऱ्या एखाद्या व्यक्तीने आपल्या जवळच्या आणि आवडत्या व्यक्तीशी अशाप्रकारे जादू की झप्पी घेतली तर या कॉर्टिसॉल हार्मोनच्या निर्मिती वर नियंत्रण बसते आणि ताण तणाव कमी होतो असे या संशोधनात म्हटले आहे.
जादू की झप्पीची उपयुक्तता सिद्ध झाली असली तरी हा प्रयोग करण्यापूर्वी समोरच्याला अशा प्रकारच्या जादूच्या झप्पीची गरज आहे की नाही हे पाहणे महत्त्वाचे आहे असेही या संशोधनात म्हटले आहे.
अनेक वेळा सामाजिक वातावरणामध्ये अशा प्रकारे एकमेकांना आलिंगन देणे याचा चुकीचा संदेश जाणे शक्य असल्याने तणावाखाली वावरणाऱ्या माणसाला खरंच अशा जादूच्या झप्पीची गरज असेल तरच जवळच्या लोकांनी हा प्रयोग करावा असा इशारा या संशोधनात देण्यात आला आहे.