मुंबई – खासदार नवनीत राणा आणि त्याचे पती आमदार रवी राणा यांच्यात आणि शिवसेनेत सुरू असलेली शाब्दिक जुगलबंदी थांबण्याचं नाव घेत नाहीये. नवनीत राणा यांनी केंद्र सरकारकडे आणि लोकसभा अध्यक्षांकडे ठाकरे सरकारची तक्रार केल्यानंतर शिवसेनेने त्यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली आहे.
नवनीत राणा ‘सी ग्रेड पब्लिसिटी स्टंटबाजी’ करतात असा खोचक टोला शिवसेनेच्या नेत्या आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी लगावला. दिल्लीत भाजप नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर राणा दाम्पत्यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली. त्यांच्या टीकेला पेडणेकर यांनी चोख प्रत्युत्तर दिलं.
किशोरी पेडणेकर पुढं म्हणाल्या की, तुम्ही वाह्यात आहात. सी ग्रेड पब्लिसिटी करायला तुम्हाला लोक सांगतात ते तसं करतात. नवनीत राणा या स्पॉडिलॅसिसच्या रूग्ण नाही तर मनोरुग्ण आहे, अशी टीकाही पेडणेकर यांनी केली.
दरम्यान नवनीत राणा यांच्या प्रायव्हेट रूममधील ‘लव्ह सीन’ला आमचा विरोद नाही. पण, एमआरआय चाचणी सुरू असताना मोबाईल नेणे हे धोकादायक आणि नियमांचे उल्लंघन करणारे होते. याआधी नायर रुग्णालयात मोबाईलामुळे एक मुलगा मशिनमध्ये खेचला गेला होता, याची आठवणही पेडणेकर यांनी करून दिली.