पुणे – शहरात सकाळी ऊन, तर नंतर ढगाळ असे संमिश्र वातावरण होते. मात्र उन्हाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला होता. शहरात दिवसभरात 40.7 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली असून, या महिन्यातील हे उच्चांकी तापमान आहे. तर पुढील दोन दिवस देखील दुपारनंतर आकाश अंशत: ढगाळ राहणार असल्याची शक्यता आहे.
मागील 24 तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. सोमवारी (9 मे) राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून, उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
शहरात सकाळपासून कडक ऊन होते. मात्र दुपारनंतर ढगाळ वातावरण होते. त्यामुळे उकाड्यात देखील वाढ झाली होती. मात्र दुसरीकडे संमिश्र वातावरण असतानाही रविवारी 40.7 अंश सेल्सिअस कमाल आणि 21.4 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. तर पुढील दोन दिवस (10 मेपर्यंत) कमाल तापमान 38 अंश सेल्सिअसपेक्षा अधिकच राहणार असल्याचा विभागाचा अंदाज आहे.