लातूर – एका प्रकरणात मदत करण्यासाठी तीन हजार रुपयाची लाच स्वीकारताना पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. राजेंद्र गोरख लामतुरे असे अटक केलेल्या पोलीसाचे नाव आहे. लामतुरे हे औसा पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. औसा पोलिसात भादवि 294, 323, 506 प्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी हवालदार लामतुरे यांनी तक्रारदारास पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती पहिला हप्ता 3 हजार व दुसरा हप्ता 2 हजार अशी लाच मागितली.
शुक्रवारी पाच वाजण्याच्या सुमारास लामतुरे यांनी तक्रारदार यांना पैसे घेऊन ठरलेल्या ठिकाणी बोलावले होते. तक्रारदार यांना लाच द्यायची नसल्याने त्यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती दिली. त्यानुसार सापळा रचून एसीबीच्या पथकाने तक्रारदार यांच्याकडून तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना लामतुरे यांना रंगेहाथ पकडले. पोलीस निरीक्षक अन्वर मुजावर व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टीमने ही कारवाई केली आहे. पुढील तपास अन्वर मुजावर करीत आहेत.