नवी दिल्ली – करोनाचे निर्बंध संपुष्टात येत असल्यामुळे भारताबरोबरच जागतिक पातळीवर विमान प्रवाशांची संख्या वेगाने वाढत आहे. मार्च महिन्यात दिल्ली विमानतळावरून तब्बल 3.61 दशलक्ष प्रवाशांनी प्रवास केला.
त्यामुळे दिल्ली विमानतळ जगातील दुसऱ्या क्रमांकाचे प्रवासी हाताळणारे विमानतळ ठरले आहे. पहिल्या क्रमांकावरील अमेरिकेतील अटलांटा विमानतळावरून 4.42 दशलक्ष प्रवाशांनी प्रवास केला. तिसऱ्या क्रमांकावर दुबईतील विमानतळ असून या विमानतळावरून मार्च महिन्यात 3.55 दशलक्ष प्रवाशांनी प्रवास केला असल्याची माहिती ऑफिशियल एअरलाइन गाईड या संघटनेने जारी केली आहे.
प्रवासी हाताळण्याच्या क्षमतेत 2019 मध्ये दिल्ली मधील विमानतळ 23 व्या क्रमांकावर होते. ते आता दुसऱ्या क्रमांकावर आले आहेत. यासंदर्भात बोलताना दिल्ली एअरपोर्ट इंटरनॅशनलचे मुख्य कार्यकारी अधिकारी विदेश कुमार जयपुरियार यांनी सांगितले की गेल्या दोन वर्षांमध्ये विमानतळावरील प्रवाशांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली होती. मात्र आता हळूहळू प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे.