नवी दिल्ली – भारताची स्टार महिला कुस्तीपटू अंशू मलिक हिला आशियाई कुस्ती स्पर्धेत 57 किलो वजनी गटात रजतपदकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेतील या गटाच्या अंतिम फेरीत जपानच्या त्सुगुमी साकुराईने पराभूत केल्याने तिला सुवर्णपदकाला गवसणी घालता आली नाही.
तिने या स्पर्धेत पहिल्या तीनही लढती जिंकल्या होत्या. मात्र, अंतिम सामन्यात तिला अपयश आले. तिने उझबेकिस्तानच्या शोखिदा अखमेडोव्हा व सिंगपूरच्या डॅनिले सू चिंग लिम यांना पराभूत करत उपांत्य फेरीत स्थान मिळवले होते.
उपांत्य फेरीतही तिने वर्चस्व गाजवताना मंगोलियाच्या बोलोटुया खुरेलखूचा पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. मात्र, अंतिम फेरीत तिला दर्जाला साजेसा खेळ करता आला नाही व रजतपदकावर समाधान मानावे लागले.