नवी दिल्ली – अर्थमंत्री निर्मला सीतारामन आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बॅंकेच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी अमेरिकेला रवाना झाल्या आहेत. जागतिक बॅंक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या बैठकीला उपस्थित राहण्याबरोबरच सितारामन इंडोनेशिया, दक्षिण कोरिया, श्रीलंका, दक्षिण आफ्रिकेच्या अर्थ अर्थमंत्र्यांशी यावेळी चर्चा करणार आहेत.
त्याचबरोबर सीतारामन सेमीकंडक्टर, ऊर्जा आणि इतर क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याबरोबर यावेळी चर्चा करतील. सेमीकंडक्टर तुटवड्याचा भारताबरोबरच जगालाही सामना करावा लागत आहे. त्यामुळे भारतातील वाहन कंपन्या आणि इतर इलेक्ट्रॉनिक उत्पादन कंपन्यांवर परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीमध्ये भारताने सेमीकंडक्टरच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्याचे धोरण जाहीर केले आहे. त्याकरिता भारत उत्पादन आधारित अनुदान देणार आहे.
आपल्या अमेरिका भेटीमध्ये सीतारामन सेमीकंडक्टर तयार करणाऱ्या कंपन्यांना भारतात उत्पादन घेण्यासाठी आवाहन करण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर भारतामध्ये ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये कोळसा पुरवठा कशा पद्धतीने वाढेल यासंदर्भात सीतारमन चर्चा करण्याची शक्यता आहे.
भारताचा यावर्षीचा विकास दर आठ ते साडेआठ टक्के राहणार आहे. इतर विकसित देश आणि वेगाने विकसित होणाऱ्या देशापेक्षा भारताचा विकास दर जास्त राहणार आहे. करोना व रशिया- युक्रेन युध्दामुळे जागतिक आर्थिक परिस्थितीवर नकारात्मक परिणाम होत आहे. अशा परिस्थितीमध्ये काय उपाययोजना करता येतील या विषयावरती सीतारामन या बैठकीवेळी आपले विचार व्यक्त करणार आहेत. भारतीय अर्थव्यवस्था करोनाच्या काळातही उत्तमरित्या कार्यरत होती. त्याचबरोबर आगामी काळातही भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाटचाल करणार आहे. याबद्दल आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बॅंकेने भारताचे कौतुक केले आहे.
………