मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंत्रालयात जात नसल्याच्या मुद्यावरून विरोधकांनी त्यांच्यावर वारंवार टीकास्त्र सोडले होते. मात्र आज तब्बल दोन वर्षानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंत्रालयात दाखल झाले. करोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवासस्थानातून राज्याचा कारभार पाहिला. तर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर मंत्री मंत्रालयात येत होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात दाखल होताच विविध विभागाचा दौरा केला. करोनाची लाट ओसरत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रकृती अस्वस्थाचा त्रास होऊ लागला होता. मुख्यमंत्र्यांवर शस्त्रक्रिया झाल्याने त्यांना वैद्यकीय कारणास्तव विश्रांतीचा सल्ला देण्यात आला होता. या शस्त्रक्रियेमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जाहीर कार्यक्रमात उपस्थित राहण्यावर मर्यादा आल्या होत्या.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज मंत्रालयातील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना फुलं वाहून अभिवादन केले. तसेच पुराभिलेख संचालनालयाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनदर्शन प्रदर्शनाची पाहणी केली आणि विविध विभागांना भेट दिली. pic.twitter.com/pFhtRH06te
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 13, 2022
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीत विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन पार पडले होते. विरोधकांनी यावेळीही त्यांच्यावर टीका केली होती. मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी तात्पुरत्या काळासाठी इतरांकडे देण्याचा सल्लाही विरोधकांनी दिला होता.
शस्त्रक्रियेच्या काही महिन्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा जाहीर कार्यक्रमात हजेरी लावण्यास सुरुवात केली होती. मात्र, यामध्ये ऑनलाइन सहभाग अधिक होता. मागील काही दिवसांत मुख्यमंत्र्यांनी सरकारच्या योजना, प्रकल्पांच्या लोकार्पण, भूमीपूजनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आगामी काही दिवसात आणखी सक्रिय होतील असा अंदाज व्यक्त केला जात होता. आज, मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात हजेरी लावल्याने त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे म्हटले जात आहे.