यवतमाळ – एसटी बसच्या मागील चाकाखाली आल्याने इसमाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना पुसद शहरातील बसस्थानकात सोमवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास घडाली. विकास रामभाऊ गावंडे (वय 37, रा. श्रीरामपूर पुसद) असे अपघातात मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नेर तालुका आगाराची एसटी बस क्रमांक एमएच-40 एन 8946 ही बस अमरावती ते पुसद आली होती. दरम्यान एसटी बसस्थानकामध्ये येत असताना गावंडे हे एसटीच्या मागील चाकाखाली अचानक आले. या अपघातात त्यांच्या डोक्याला जोरात मार बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पुसद उप जिल्हा रुग्णालयात पाठविला. या घटनेचा पुढील तपास पुसद पोलिस करत आहेत.