ठाणे, – राज ठाकरेंची गुढीपाडव्याला सभा झाल्यानंतर उद्या, मंगळवारी ठाण्यात मनसेचे दुसरी जंगी सभा पार पडत आहे. यामुळे या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. या सभेत आता राज ठाकरे नेमकं काय बोलू शकतात याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
राज ठाकरे आणि त्यांची गुढीपाडव्याच्या दिवशी झालेली सभा अजूनही चर्चेत आहे. या सभेतील त्यांच्या वक्तव्याचे अजूनही पडसाद उमटत आहेत. काही मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देखील दिले आहेत. अशातच आता उद्या ठाण्यात लगेचच दुसरी सभा होत असल्यामुळे आता राज ठाकरे नेमका कुणावर निशाणा साधणार याकडे लक्ष लागले आहे.
गुढीपाडव्याच्या राज ठाकरे यांच्या भाषणानंतर शरद पवार यांनी ठाकरेंवर टीका करताना एखादी सभा घेऊन बोलतात आणि गायब होतात असे विधानं करत मनसेच्या थेट वर्मावर बोट ठेवले होते. त्यामुळे हाच गैरसमज खोटा ठरवण्याची तयारी केल्याचे लगेच जाहीर झालेल्या ठाण्याच्या सभेवरून दिसत आहे. त्यामुळेच ठाण्यात उत्तर सभा असे ठीक ठिकाणी बोर्ड लावण्यात आले आहेत.
यासोबतच ठाण्यात मोठं मोठ्या एलईडी स्क्रीन देखील लावण्यात आल्या आहेत. म्हणजेच एकेकाळी “लाव रे तो व्हिडिओ’च्या माध्यमातून मोदींची पोलखोल करण्याचा प्रयत्न राज यांनी केला होता. तो प्रयोग आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि महाविकास आघाडीच्या बाबत तर राज ठाकरे करणार का अशी देखील चर्चा रंगू लागली आहे.
राज ठाकरे मुंबईतील आपल्या सभेनंतर राजकीय पातळीवर पुन्हा एकदा महत्वाचे स्थान घेण्याची संधी मिळत असताना विरोधकांकडून केली जाणारी टीका खरी होऊ नये याची काळजी घेताना दिसत आहेत त्यामुळेच आपण ठाण्यात नेमकं काय बोलणार याचा टिझर देखील नुकताच मनसेच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आला आहे.