नवी दिल्ली – डिजिटल व्यवहार आणि ऑनलाइन सेवा वाढत असल्याने सायबर फसवणूकही वाढत आहे. तंत्रज्ञानाचा फायदा घेत सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करत आहेत. खातेदारांच्या बँक खात्यातून किंवा वॉलेटमधून संपूर्ण रक्कम गायब केली जात आहे. विशेषत: अॅपद्वारे व्यवहार करणाऱ्यांना सायबर भामटे अधिक लक्ष्य करत असतात. सायबर गुन्हेगार अशा अॅप्सवर हल्ला करतात जे एकतर मोठ्या कंपन्यांचे किंवा बँकांचे आहेत किंवा ज्याद्वारे अधिक व्यवहार होतात.
सध्या देशातील सर्वात मोठी बँक SBI सायबर गुन्हेगारांच्या निशाण्यावर आहे. SBI YONO च्या नावाने एसएमएस फिशिंग घोटाळा केला जात आहे. जर तुमचेही SBI मध्ये खाते असेल तर तुम्ही सावध राहण्याची गरज आहे.
पॅन अपडेटच्या नावाखाली फसवणूक –
पॅन अपडेच्या नावाखाली सायबर भामटे फसवणूक करत आहेत. एसबीआयच्या खातेधारकांना एसएमएस पाठवला जात आहे, ज्यामध्ये एक लिंक आहे. त्या एसएमएसमध्ये असे सांगण्यात येते की, जर तुम्ही लिंकवर क्लिक करून तुमचे पॅन डिटेल्स अपडेट केले नाही तर त्यांचे SBI YONO खाते बंद केले जाईल.
YONO हे SBI चे डिजिटल बँकिंग प्लॅटफॉर्म आहे. या लिंकवर क्लिक केल्यावर एसबीआय पेजसारखे दिसणारे पेज उघडेल. या ठिकाणी, ग्राहकांना वैयक्तिक माहिती भरण्यास सांगितले जाते. ग्राहकांनी त्यांची माहिती टाकताच ती थेट हॅकर्सपर्यंत पोहोचते. यानंतर हॅकर्स खात्यातील सर्व पैसे चोरतात.
एसबीआयने ग्राहकांना दिला इशारा –
हा एक नवीन सायबर हल्ला आहे. SBI ने ग्राहकांना कोणत्याही प्रकारच्या ई-मेल, एसएमएस, कॉल्स, एम्बेडेड लिंक्सना प्रतिसाद देऊ नये असा इशारा दिला आहे. जर कोणी तुम्हाला वैयक्तिक माहिती किंवा बँकेची माहिती विचारत असेल तर त्याला अजिबात माहिती देऊ नका.
तुम्हाला कधी वैयक्तिक माहिती विचारणारा असा कॉल किंवा एसएमएस आला, तर तुम्ही रिपोर्ट.phishing@sbi.co.in वर तक्रार करू शकता. तुम्ही बँकेच्या हेल्पलाइन क्रमांक 1930 वर देखील संपर्क साधू शकता, अशी माहिती एसबीआयने दिली आहे.