आजपासून अंमलबजावणी; नो पार्किंगमधील वाहने उचलणार
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन आणि भाजपकडून शहरामध्ये पार्किंग पॉलिसी राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही पार्किंग पॉलिसी शहरामध्ये आठ महिन्यांपूर्वी सुरू केली होती. मात्र, योग्य नियोजनाअभावी पार्किंग पॉलिसी बंद पडली. त्यानंतर आता पुन्हा आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी सोमवारपासून (दि. 21) शहरामध्ये पार्किंग पॉलिसीची अंमलबजावणी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
महापालिकेच्या वतीने शहरातील प्रमुख रस्त्यांवर पार्किंग पॉलिसीची 1 जुलै 2021 पासून अंमलबजावणी सुरू केली आहे. यासाठी ठेकेदारी संस्थेची नियुक्ती केली. त्यांच्यामार्फत पार्किंग पॉलिसी राबविताना रस्त्याच्या कडेला निश्चित केलेल्या ठिकाणीच वाहने लावण्यास परवानगी देण्यात आली. त्यापोटी वाहनचालकांकडून शुल्क आकारले जाते. मात्र, पार्किंग पॉलिसीला सुरुवातीपासूनच शहरातील सामाजिक संघटनांनी विरोध केला होता. तसेच महापालिकेतील विरोधक असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने देखील याबाबत विरोधात भूमिका घेत आंदोलन केले होते. त्यामध्येच ठेकेदारी संस्थेला अपेक्षित असलेले उत्पन्न मिळत नसल्याने संस्थेने हे कामच बंद केले होते.
दरम्यान, नुकतीच पार्किंग पॉलिसी अंमलबजावणी करण्याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील व पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत पुन्हा पार्किंग पॉलिसीची अंमलबजावणी करण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे नो पार्किंगमध्ये वाहने लावणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. कारवाई करण्याच्या दृष्टीने महापालिकेने पोलीस विभागाच्या मदतीने टोईंग व्हॅनद्वारे वाहने उचलण्याचे नियोजन केले आहे. तसेच, नो पार्किंगमध्ये लावण्यात आलेल्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने हा निर्णय घेतला आहे.
उचललेली वाहने लावण्यासाठी चार ठिकाणे
नो पार्किंगमधील वाहने टोईंग व्हॅनद्वारे उचलल्यानंतर ती पोलीस विभागाच्या मदतीने पार्क करण्यासाठी चार ठिकाणे निश्चित केली आहेत. त्यामध्ये निगडी भक्ती-शक्ती उड्डाणपुला खालील जागा, पिंपरी इंदिरा गांधी पुलानजीक मोकळी जागा, सांगवी वाहतूक विभाग कार्यालया शेजारी सांगवी फाटा व चिंचवड एस. के. एफ. कंपनी समोरील वाहतूक पोलीस चौकी नजीकच्या जागेचा वापर करण्यात येणार आहे.
दुचाकीसाठी 5 तर चारचाकीसाठी 10 रुपये
रस्त्यावर वाहन लावण्यासाठी एका तासासाठी दुचाकी, रिक्षासाठी 5, मोटारी, टेम्पोसाठी 10 रुपये, मिनी बससाठी 25, ट्रक व खासगी बससाठी 100 रुपये शुल्क द्यावे लागणार आहे.
असा होईल फायदा
योग्य ठिकाणी वाहने पार्क केल्याने वाहतुकीस अडथळा कमी होईल. पार्किंगमध्ये वाहने लावल्याने संबंधित चालकास वाहन सुरक्षिततेची हमी राहील. तसेच एकाच जागी धूळ खात पडलेल्या वाहनांची संख्या कमी होईल. शहरामध्ये वाहतुकीला अडथळा निर्माण न होता शिस्त लागले असा दावा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.