लखनौ : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. उत्तरप्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर व उत्तराखंड या पाच राज्यातील जनतेने निवडणुकांमध्ये कोणाच्या पारड्यात मतांचं वजन टाकलंय याचं चित्र थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे. अशातच राजकीयदृष्ट्या महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये काय निकाल लागतो याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
उत्तर प्रदेशमध्ये १९८५ पासून कोणताही पक्ष सलग दोनदा सत्ता स्थापन करू शकलेला नाहीये. यंदा उत्तर प्रदेशातील जनता योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी भाजपला पुन्हा संधी देणार की १९८५ पासून सुरु असलेली परंपरा कायम ठेवणार याबाबत कमालीचे औत्सुक्य आहे.
अशातच, निवडणूक निकालाच्या सुरुवातीच्या कलांनुसार उत्तर प्रदेशात भाजपला मोठी आघाडी मिळाल्याचं दिसतंय. हाती आलेल्या कलांनुसार भाजप २०७ जागांवर आघाडीवर आहे. राज्यात विधानसभेच्या ४०३ जागा असून त्यापैकी ३०६ जागांवरील कल हाती आले आहेत. भाजपनंतर समाजवादी पक्ष ८४ जागांवरील आघाडीसह दुसऱ्या स्थानावर असल्याचं दिसतंय. बहुजन समाज पक्ष व काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या पारड्यात अनुक्रमे ६ व ५ जागांची आघाडी असल्याचे दिसत आहे.
गेल्या पंचवार्षिक निवडणुकांमध्ये भाजपने उत्तर प्रदेशमध्ये ३०० हून अधिक जागा जिंकल्या होत्या. यंदाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये देखील भाजप बहुमताचा आकडा पार करेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.