पुणे : निवडणुकीच्या प्रारूप प्रभाग रचनेत बाणेर-सुस-महाळुंगे प्रभाग क्र.13 दोन सदस्यांचा झाला आहे. या प्रभागावरच मोठ्या प्रमाणात हरकती आल्या आहेत. याबाबत न्यायालयातही तक्रार दाखल झालेली आहे. त्यामुळे, हरकतींच्या अंतिम अहवालानंतर या प्रभागाच्या रचनेत बदल होण्याची दाट शक्यता आहे. यात बदल झाल्यास याचा हादरा पश्चिम पुण्यातील तब्बल 14 ते 15 प्रभागांना बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
दरम्यान, हरकती आणि सूचनांच्या सुनावणीनंतर अहवाल तयार करण्याच्या कामाला वेग आला आहे. दि. 2 मार्चला तो निवडणूक आयोगास नियोजित वेळापत्रकाप्रमाणे सादर केला जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. सुनावणीनंतर पूर्ण शहराच्या प्रभाग रचनेत जवळपास 18 ते 20 महत्त्वाचे बदल होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
प्रभाग रचनेवर सुमारे 3 हजार 596 हरकती आल्या होत्या. या निवडणुकीसाठी 58 प्रभाग निश्चित करण्यात आले. यामध्ये 57 प्रभाग 3 सदस्यांचे तर एक प्रभाग दोन सदस्यांचा असणार आहे. दोन सदस्यांचा बाणेर-सूस-महाळुंगे प्रभाग क्र. 13 क्रमांकाचा आहे. नियमानुसार शेवटचा प्रभाग दोनचा असावा, असे अपेक्षित असताना मध्येच दोनचा प्रभाग कसा झाला, असा सवाल उपस्थित करीत या प्रभागासाठीच राजकीय हस्तक्षेप करत आसपासच्या प्रभागांची मोडतोड केल्याचे राजकीय आरोप- प्रत्यारोप सुरू आहेत. यातूनच हरकती आणि सूचनांच्या सुनावणीत या प्रभागाच्या रचनेवर मोठ्या प्रमाणात तीव्र आक्षेप घेण्यात आले आहेत. त्यामुळे, बाणेर-सूस-महाळुंगेच्या प्रभाग रचनेच्या सुनावणीनंतर बदल होऊ शकतो. हा प्रभाग दोन ऐवजी तीन सदस्यांचा अथवा तो दोनचा ठेऊन त्याच्या सीमा बदल झाल्यास याचा परिणाम पश्चिम पुण्यातील अनेक प्रभागांवर पडण्याची शक्यता आहे.