नांदेड – नांदेड जिल्ह्यातील भोकर ते हिमायतनगर रस्त्यावर भीषण अपघात झाला आहे. लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या टेम्पोला धडक दिल्याने अपघात झाला आहे. या भीषण अपघातात नवरीसह आठ जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी (दि.21) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास सोमठाणा पाटी जवळ घडली.
विवाह सोहळा झाल्यानंतर नववधूला घेऊन वऱ्हाडी पुन्हा परतत होते. यावेळी टाटा मॅजिक आणि टेम्पोमध्ये समोरासमोर अपघात झाला. अपघातामध्ये 8 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला असून काहीजण गंभीर जखमी झाले तर काही जणांना किरकोळ जखम झाली आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जखमींना जवळच्या भोकर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या अपघातात नवरी पुजा ज्ञानेश्वर पामलवाड (वय 20 वर्ष, रा. साखरा ता. उमरखेड), माधव पुरभाजी सोपेवाड (वय 30, रा. जामगाव ता. उमरी), दत्ता ज्ञानेश्वर पामलवाड (वय 22 रा. साखरा), सुनील दिगंबर थोटे (वय 30 रा. चालगणी ता. उमरखेड) यांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य चौघांची नावे समजु शकले नाही.