पहिल्या “फास्ट रेडिओ बर्स्ट’चे पूर्वज शोधण्यात यश
“जीएमआरटी’द्वारे अवकाशातील वायू, ताऱ्यांचे निरीक्षण
पुणे – “फास्ट रेडिओ बर्स्ट’च्या (एफआरबी) आकाशगंगेचे अलीकडेच विलीनीकरण झाले आहे. एफआरबी प्रोजेनिटर (पूर्वज) बहुधा या विलीनीकरणाच्या घटनेमुळे मोठा तारा तयार झाला आहे. एफआरबी होस्टमध्ये अलीकडील विलीनीकरणाच्या प्रत्यक्ष पुराव्याची ही पहिलीच घटना ठरली आहे. एफआरबी प्रोजेनिटर (पूर्वज) समजून घेण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे, असे मत खगोलशास्त्र संशोधकांनी व्यक्त केले.
पुणे विद्यापीठ आवारातील “एनसीआरए-टीआयएफआर’च्या बलप्रीत कौर आणि निस्सीम काणेकर आणि कॅलिफोर्निया विद्यापीठ, यूएसएचे जे. झेवियर प्रोचास्का या खगोलशास्त्रज्ञांनी जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप अर्थात “जीएमआरटी’च्या मदतीने हे संशोधन केले आहे. त्याची माहिती शुक्रवारी देण्यात आली. यावेळी मार्गदर्शक व शास्त्रज्ञ प्रा. यशवंत गुप्ता, एनसीआरए केंद्र संचालक जयराम चेंगलूर, अधिष्ठाता प्रा. ईश्वर चंद्र, एनसीआरएचे वरिष्ठ अधिकारी डॉ. जे. के. सोळंकी, अनिल राऊत उपस्थित होते.
“फास्ट रेडिओ बर्स्ट’च्या आकाशगंगेतून अणू हायड्रोजन वायूचे वितरण मॅप करण्यासाठी अद्ययावत जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप वेधशाळेचा वापर केला आहे. ज्यामुळे स्फोटाच्या उत्पत्तीबद्दल रोमांचक संकेत समोर आले आहेत. “एफआरबी’ आकाशगंगेचे विलीनीकरण झाले आहे. तसेच यासाठी 21 सेमी रेषेच्या जीएमआरटी निरीक्षणांचा वापर करून एफआरबी आकाशगंगामधील गॅस वितरणाचा अभ्यास केला आहे, असे बलप्रीत कौर यांनी सांगितले.
एफआरबी या दूरच्या आकाशगंगेतील अत्यंत तेजस्वी रेडिओ पल्सेस आहेत. ज्या फक्त काही मिलिसेकंदांसाठी टिकतात. जरी एफआरबी 15 वर्षांपूर्वी प्रथम सापडले असून ते एक हजाराहून अधिक सापडले आहे. मात्र, तरीही आपल्याला अद्याप हे माहीत नाही की, इतक्या कमी वेळात कोणत्या प्रकारच्या खगोलीय वस्तू इतकी ऊर्जा निर्माण करू शकतात. आकाशगंगांमधील एफआरबीच्या परिसरातील वायू आणि ताऱ्यांचे निरीक्षण आणि हे स्फोट कसे तयार झाले हे समजून घेण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहेत.
– बलप्रीत कौर, संशोधक