टीईटी घोटाळाप्रकरणी आणखी एकाला अटक
पुणे – शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) 2018 च्या परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणात मुकुंदा जगन्नाथ सूर्यवंशी ( वय 33 रा; अगोदे,
ता. नांदगाव जि.नाशिक) याला पोलिसांनी अटक केली. त्याने परीक्षार्थींची यादी पेनड्रायव्हमध्ये दिली होती आणि परीक्षार्थींकडून घेतलेले 80 लाख रूपयांची रोकड एजंट संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ यांना आणून दिल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून, व्याप्ती खूप मोठी आहे. त्यामुळे सूर्यवंशीकडे सखोल तपास आवश्यक आहे.
यापूर्वी अटक केलेल्या संतोष आणि अंकुश या आरोपींना परीक्षार्थींची यादी पेनड्राइव्हमध्ये दिली. ते परीक्षार्थी नक्की कोणते आहेत? त्यांची नावे अटक आरोपींकडून प्राप्त करायची आहेत. तसेच मार्क वाढविण्यासाठी परीक्षार्थी कोणामार्फत आरोपींच्या संपर्कात आले आहेत? त्यांनी कोणाच्या मार्फत सूर्यवंशीला पैसे दिलेले आहेत.
एकूण किती पैसे दिले आहेत. याबाबत सखोल तपास करणे आहे, असा युक्तिवाद सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी न्यायालयात केला. तो ग्राहय धरत न्यायालयाने सूर्यवंशी याला 21 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.