पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 2022-23 या अंदाजपत्रकात आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी 115 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये अ क्षेत्रीय कार्यालयासाठी सर्वाधिक 28 कोटी 23 लाख रूपयांची तर सर्वात कमी इ क्षेत्रीय कार्यालयासाठी 6 कोटी 71 लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.
शहरात आठ क्षेत्रीय कार्यालये असून या कार्यालया अंतर्गत विविध कामे करण्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद करण्यात येते. मात्र, करोनाच्या महामारीमुळे 2022-23चे अंदाजपत्रकात सुमारे 600 कोटींपेक्षा कमी उत्पन्न मिळण्याची शक्यता असल्याचे गृहीत धरण्यात आले आहे. त्यामुळे क्षेत्रीय कार्यालयांना तरतूद निश्चित करताना प्रशासनाने हात आखडता घेतला आहे.
विकासकामांसाठी 1,618 कोटींची तरतूद
महापालिकेच्या विविध विकासकामासाठी 1 हजार 618 कोटी 68 लाख रुपये रकमेची तरतूद ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर मागासवर्गीय कल्याणकारी योजनांसाठी 52 कोटी 85 लाख, क्रीडासाठी 107 कोटी 93 लाख, महिलांसाठी 45 कोटी, दिव्यांगासाठी 44 कोटी 6 लाख आणि भूसंपादनासाठी 130 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.