पिंपरी – बुधवारी नगरसेवक पदाचा राजीनामा दिलेले वसंत बोराटे यांनी गुरुवारी (दि. 17) सकाळी मुंबईत राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अजित गव्हाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष झाल्यानंतर भोसरी मधूनच त्यांनी भाजपला पहिला धक्का दिला आहे.
प्रभाग क्रमांक दोन मधून भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले वसंत बोराटे यांनी बुधवारी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ते कोणत्या पक्षात जाणार याबाबत उत्सुकता होती. गुरुवारी सकाळी त्यांनी मुंबईत जाऊन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे राष्ट्रवादीचे नेते योगेश बहल यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोराटे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशामुळे भाजपाला खिंडार पडण्यास सुरुवात झाल्याचे मानले जात आहे.