पुणे – खासदार किरीट सोमय्या यांच्या सत्कारानिमित्त भाजपने महापालिकेत शक्तीप्रदर्शन केले. ते पाहता, शुक्रवारी सकाळपासूनच महापालिकेत पोलीस बंदोबस्त होता. शिवाय, नेहमीचे सुरक्षा रक्षकही होते. या सर्व पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांना प्रवेश दिला जात नव्हता. त्यामुळे या राजकीय साठमारीत सामान्यांना त्रास सहन करावा लागला.
सोमय्या येणार असल्याने महापालिकेचे दोन्ही प्रवेशद्वार दुपारी एक वाजताच सर्वसामान्यांना बंद करण्यात आले होते. तसेच जुन्या इमारतीच्या प्रवेश द्वारासमोर बॅरिकेडिंग करत फक्त नगरसेवक आणि माध्यमांचे प्रतिनिधी आणि भाजपच्या काही कार्यकर्त्यांना प्रवेश देण्यात आला होता. मात्र, त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला. शहरी गरीब योजनेअंतर्गत महापालिकेचे पत्र घेण्यासाठी अनेक नागरिक आले होते. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी त्यांना बाहेरच थांबवले. त्यानंतर सोमय्या साडेपाचच्या सुमारास महापालिकेबाहेर गेल्यानंतर नागरिकांना आत सोडण्यात आले. मात्र, कामकाजाची वेळ संपल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काढता पाय घेतला होता. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप झाला.
वाहतूक कोंडीचाही फटका
पोलिसांकडून महापालिकेसमोरील रस्ता वाहतुकीसाठी बंद केला होता. तसेच, टिळकपूल तसेच कॉंग्रेस भवनाकडून आलेल्या वाहनांना या रस्त्याने येण्यास बंदी होती. नवीन इमारतीसमोर पीएमपीचा बस थांबा असल्याने आणि मोकळ्या जागेत भाजप पदाधिकाऱ्यांनी वाहने पार्क केल्याने वाहतूक कोंडी झाली होती. शिवाजी रस्त्यावर पालिका भवनासमोर भाजप कार्यकर्ते ढोल-ताशे घेऊन जमलेले असल्याने सोमय्या आल्यानंतर पोलिसांनाही जवळपास 15 ते 20 मिनिटे शिवाजी रस्ताही बंद करावा लागला. त्यामुळे शिवाजीनगर भागात कोंडी झाली होती.