जुन्नर – जुन्नर तालुक्यातील किल्ले शिवनेरी येथे जाण्यासाठी भोसरी डेपो ते जुन्नर अशी पीएमपीएमपीएलची बससेवा शुक्रवारी (दि. 11) सुरू करण्यात आली. पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह राज्यातून आणि देशभरातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक हे शिवजन्मभूमी किल्ले
शिवनेरी, जुन्नर, नारायणगाव, ओझर, लेण्याद्री येथे येत असतात. नारायणगाव, जुन्नर परिसरातील नागरिक व कामगार विद्यार्थी हे देखील एसटी बससेवा बंद असल्याने पुणे, पिंपरी चिंचवडला जाण्यासाठी खाजगी वाहनाने प्रवास करत आहेत.
आज प्रत्यक्ष बससेवेला सुरवात झाल्यामुळे जुन्नर तालुक्यात पर्यटनाच्या निमित्ताने येणाऱ्या पर्यटक, नागरिकांची व भाविकांची होणारी गैरसोय भोसरी ते जुन्नर मार्गावर पीएमपीएमएलची बससेवा सुरु झाल्यामुळे दूर झाली आहे. शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील समस्त जुन्नरकरांना हि शिवजयंती निमित्ताने भेट मिळाल्याने सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे.
तीन गाड्यांद्वारे दहा फेऱ्या
ही बससेवा भोसरी बस डेपोतून 3 बसेसच्या 10 थेट फेऱ्या होणार आहेत. पैकी 1 बस जुन्नर मुक्कामी असून सकाळी 6:30 वाजता जुन्नर येथून भोसरीकडे रवाना होणार आहे. आगामी काळात कर्मचारी उपलब्धतेनुसार 500 इलक्ट्रिक बसचे नियोजन प्रस्तावित आहे. जुन्नर ते भोसरी बससेवेदरम्यान 80 ते 90 थांबे असून सुमारे साडेतीन तासांचा प्रवास असणार असल्याची माहिती पीएमपीएमएल वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे यांनी दिली.