सोनम परब
या नवीन वर्षात अनेक नवीन स्टारकास्ट हिंदी चित्रपटांच्या पडद्यावर पाहावयास मिळणार आहेत. काही मंडळी नव्याने एंट्री करत आहेत तर काही जणांनी यूट्यूब, टीव्हीवर आणि दक्षिणेत अगोदरच कमाल दाखवलेली आहे.
एका अर्थाने बॉलीवूड नायकांना स्पर्धा करण्यासाठी दक्षिणेतील सुपरस्टार्सनी आपली कंबर कसली आहे. रामचरण, यश, विजय देवरकोंडा, ज्युनिअर एनटीआर यांच्या हिंदी सिनेमासृष्टीतील प्रवेशाची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. दक्षिणेतील डब सिनेमे उत्तरेत चांगला व्यवसाय करत असल्याने हिंदी चित्रपटातही ही मंडळी छाप पाडतील, असा कयास बांधला जात आहे.
नवीन वर्षात दक्षिणेतील नायक आणि नायिका बॉलीवूडमध्ये एंट्री करण्याच्या तयारीत आहे. नायिकांचा विचार केल्यास रश्मिका मंदाना, पलक तिवारी, मानुषी छिल्लरसह अनेक सेलिब्रिटी 2022 मध्ये बॉलीवूड बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे.
सुहाना खान : किंग खानची लाडकी लेक सुहाना खान ही बॉलीवूडमध्ये यावर्षी एंट्री करू शकते. सुहाना ही प्रसिद्ध अमेरिकी कॉमिक्स मालिका “द आर्चिज’च्या नेटफ्लिक्स व्हर्जनमधून झळकण्याची शक्यता आहे.
खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा : बोनी कपूर आणि श्रीदेवीची कन्या खुशी कपूर देखील बॉलीवूडमध्ये येण्याचे संकेत मिळत आहेत. “द आर्चिज’ ही एक मल्टीस्टार मालिका असेल आणि त्यात बॉलीवूडचे अनेक स्टार किड्स असतील. यात खुशी कपूरचेही नाव घेतले जात आहे. एवढेच नाही तर अगस्त्य नंदाचे देखील नाव समोर आले आहे. म्हणजेच या मालिकेत तीन प्रसिद्ध चेहरे असतील तर तिन्ही खानदानातील हे स्टार चाहत्यांना मालिकेकडे खेचून आणू शकतील.
शालिनी पांडे : अभिनेत्री शालिनी पांडेने अर्जुन रेड्डीबरोबर दक्षिणेत काम करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. आता ती रणबीर सिंहबरोबर “जयेशभाई’ चित्रपटात धमाल उडवून देणार आहे. जयेशभाई हा चित्रपट 25 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. प्रसिद्ध युट्यूबर प्राजक्ता कोळीदेखील “जुग जुग जिओ’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पाऊल टाकत आहे.
नयनतारा : नयनतारा ही बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खान बरोबर दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दक्षिणेतील एटली करणार आहेत.
अदिवी शेष : अदिवी शेष हा “मेजर’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये प्रवेश करणार आहे. हा एक बायोपिक असेल. अदिवी हा 2008 च्या मुंबई हल्ल्यात हुतात्मा झालेले मेजर संदीप उन्नीकृष्णन यांची भूमिका साकारणार आहे.
विजय देवरकोंडा : दक्षिणेतला सुपरस्टार विजय देवरकोंडा हा बॉलीवूडमध्ये धमाल उडवून देण्यास सज्ज झाला आहे. विजय हा अनन्या पांडेसमवेत एका मोठ्या बजेटच्या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर देखील चाहत्यांनी पाहिला आहे.
विजय सेतुपती : सेतुपती हा “मेरी ख्रिसमस’ आणि “मुंबईकर’ या चित्रपटाने बॉलीवूडमध्ये पाऊल टाकत आहे. “मेरी ख्रिसमस’मध्ये तो अभिनेत्री कतरिना कैफबरोबर दिसणार आहे.
मानुषी छिल्लर : 2017 ची मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर ही “पृथ्वीराज’ चित्रपटातून मायानगरीत पाऊल टाकत आहे. मानुषी ही चित्रपटात अक्षयकुमारसोबत दिसणार आहे.
शंतनू माहेश्वरी : शंतनू माहेश्वरी हा टीव्हीनंतर थेट संजय लीला भन्साळीचा चित्रपट गंगूबाई काठियावाडी या चित्रपटात दिसणार आहे.
रश्मिका मंदाना : दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना ही “मिशन मजनू’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये एंट्री करत आहे. रश्मिका ही चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रासमवेत दिसणार आहे.
शनाया कपूर : संजय कपूरची लेक शनाया कपूरला करण जोहर हा ब्रेक देत आहे. नव्या चित्रपटाबाबत अद्याप घोषणा झालेली नाही. धर्मा प्रॉडक्शन हे शनाया कपूरला बॉलीवूडमध्ये आणत असल्याची वार्ता आहे. 2022 मध्ये तिचा पहिला चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. चित्रपटाचे कथानक हे प्रेमाचा त्रिकोणावर आधारलेले असेल, असे सांगितले जात आहे. शनायाने जुलै 2021 पासून शूटिंग करण्यास सुरुवात केली.
पलक तिवारी : श्वेता तिवारीची लेक पलक तिवारी ही लवकरच चित्रपट “रोझी’ मध्ये दिसेल. तिवारीने म्यूझिक व्हिडिओ “बिजली बिजली’ या माध्यमातून अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल टाकले. बॉलीवूडचा नायक विवेक ओबेरॉय हा रोझी चित्रपटात असेल.
प्रियमणी राज : प्रियमणी ही “मैदान’ चित्रपटात दिसणार आहे. यात अजय देवगणला आघाडीची भूमिका देण्यात आली आहे. तो फुटबॉल प्रशिक्षक म्हणून दिसणार आहे. हा चित्रपट 3 जून 2022 मध्ये प्रदर्शित होणार आहे.
अजय नागर : यूट्युबर अजय नागर ऊर्फ कॅरी मिनाती हा चित्रपट “रनवे 34′ मधून बॉलीवूडमध्ये एंट्री करत आहे.
नागा चैतन्या : दक्षिणेतील सुपरस्टार नागा चैतन्या हा लालसिंह चढ्ढा या चित्रपटात आमीर खान आणि करिना कपूरबरोबर दिसणार आहे. तो बॉलीवूडमध्ये येण्यावरून खूप उत्सुक आहे.
लक्ष्य : लक्ष्य हा आता टीव्हीवरून सिल्व्हर स्क्रिनवर धमाल करताना दिसेल. तो दोस्ताना-2 मध्ये आघाडीचा रोल करेल, अशी चर्चा आहे.
यश : नायक यश हा सुपरहिट चित्रपट केजीएफ-2 मध्ये दिसणार आहे. त्याच्या जोडीला संजय दत्त देखील असणार आहे.
अल्लू अर्जुन : दक्षिणेतील लोकप्रिय अभिनेता अल्लू अर्जुन हा बॉलीवूडमध्ये कधी पाऊल टाकणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. 17 डिसेंबरला प्रदर्शित झालेला “पुष्पा’ हा सध्या बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. यात रश्मिका मंदानादेखील आहे. या चित्रपटाने वर्ल्ड वाइड 300 कोटींहून अधिक कमाई केली आहे.
मात्र, सध्या तरी तो बॉलीवूडमध्ये येईल, असे वाटत नाही. कारण एका मुलाखतीत तो म्हणाला की, एका चित्रपटाची मला ऑफर मिळाली होती; परंतु त्याचे कथानक आवडले नाही. हिंदी चित्रपटात काम करण्यास तयार आहोत, पण चांगले कथानक असणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे त्याला हिंदी चित्रपटात आघाडीची भूमिका करायची आहे. हिंदीतील नायकाच्या सहायकाची भूमिका करण्यास तो उत्सुक नाही.