सुपिरीअर, (अमेरिका) – कोलोरॅडोत भडकलेल्या वणव्यामध्ये किमान 500 घरे पूर्णपणे नष्ट झाली आहेत. हा वणवा भडकल्यापासून या भागातील रहिवाशांना सुखरूप ठिकाणी हलवण्यात आले होते. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे या भागात हा वणवा रहिवासी भागात पसरला आणि घरे, कार आणि अन्य रहिवासी साहित्याची पूर्णपणे राखरांगोळी झाली आहे. या आगीमध्ये किमान 7 जण जखमी झाले आहेत. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
सुपिरीअर भागातील ओळीने 7 घरे जळून गेली आहेत. या घरातील माणसे परत आल्यावर त्यांना घरांचे केवळ सांगाडे राहिलेले बघायला मिळाले. या अर्धवट जळालेल्या घरांमधून केवळ धुराचे लोट बाहेर पडत असल्याचे रहिवाशांना बघायला मिळाले.
डेन्वरपासून 20 मैल अंतरावरील ल्युसिविला आणि सुपिरीअर या भागामध्ये हा वणवा गुरुवारी भडकला होता. वणवा झपाट्याने पसरत असल्याचे लक्षात आल्यावर येथील नागरिकांना तातडीने या भागातून निघून जाण्यास सांगण्यात आले होते. अजूनही या भागातील रस्ते वाहतुकीसाठी बंद आहेत. जंगलामध्ये अजूनही आग धुमसत असल्याचे लांबूनही दिसत आहे.