लखनौ – प्रसिद्ध कवी आणि आम आदमी पक्षाचे माजी नेते कुमार विश्वास यांना समाजवादी पक्षाच्या प्रवेशाची ऑफर खुद्द मुलायमसिंह यादव यांनी दिली आहे. काल दिल्लीत इंदिरा प्रतिष्ठान तर्फे आयोजित एका पुस्तक प्रकाशनावेळी त्यांनी ही ऑफर दिल्याची माहिती समाजवादी कार्यकर्ते उदय प्रताप यांनी दिली.
कुमार विश्वास सध्या कोणत्याही राजकीय पक्षात नाहीत, असे जर असेल तर त्यांना समाजवादी पक्षात प्रवेश करण्यास काय हरकत आहे अशी विचारणा मुलायमसिंह यादव यांनी आपल्याकडे केली, असे उदय प्रताप यांनी सांगितले.
नंतर उदय प्रताप यांनी जाहीर व्यासपीठावरून मुलायमसिंह यांची ही इच्छा बोलून दाखवली त्यावेळी कुमार विश्वास आणि समाजवादी पक्षाचे विद्यमान अध्यक्ष अखिलेश यादव हे एकमेकांच्या जवळच बसले होते, पण त्यांनी या ऑफरला प्रतिसाद दिला की नाही हे मात्र गुलदस्त्यातच राहिले आहे.