नवी दिल्ली – दिल्लीतील वाढत्या प्रदुषणाला आळा घालण्यासाठी दिल्ली सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी येत्या 27 नोव्हेंबर पासून पेट्रोल व डिझेलवर चालणाऱ्या वाहनांना दिल्लीत प्रवेश बंदी घालण्यात येणार आहे.
दिल्लीत केवळ त्या दिवसांपासून सीएनजी किंवा इलेक्ट्रीकवर चालणारी वाहनेच प्रवेश करू शकणार आहेत. दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी आज ही घोषणा केली. सुरवातीला ही बंदी केवळ मर्यादित काळापर्यंत असणार आहे. 3 डिसेंबर पर्यंतच ही प्रवेश बंदी लागू असेल त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.
दिल्लीतील शाळा, कॉलेज प्रदुषणाच्या वातावरणामुळे बंद ठेवण्यात आली होती. तथापि त्यांचे कामकाज 29 नोव्हेंबर पासून पुर्ववत सुरू करण्यास अनुमती देण्यात आली आहे. 13 नोव्हेंबरपासून शाळा व कॉलेजेस बंद ठेवण्यात आली होती. सरकारी कार्यालयेही सोमवारपासून नियमीतपणे सुरू होणार आहेत.
सरकारी कर्मचाऱ्यांनी खासगी वाहनांचा वापर न करता सार्वजनिक परिवहन सेवेचा वापर करून कामावर यावे अशी सुचना सरकारी कर्मचाऱ्यांना करण्यात आली आहे. शहरातील बांधकामांवर व पाडकामांवरील बंदी गेल्या सोमवार पासूनच उठवण्यात आली आहे.