मुंबई – भारतीय प्रेक्षक सुपरहिरोचे चाहते आहेत. मात्र, आता भारतीय प्रेक्षकांनी या सुपरहिरोंमधील सुपरमॅनवर चांगलाच राग धरला आहे. डिसी कॉमिक्सच्या “सुपरमॅन’च्या आगामी “इनजस्टीस’ या ऍनिमेशन फिल्ममध्ये काश्मीरबाबत काही आक्षेपार्ह वक्तव्ये आणि काही आक्षेपार्ह दृश्ये देखील आहेत.
त्यामुळे भारतीय प्रेक्षक चांगलेच नाराज झाले आहेत. ट्विटर आणि अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हॅशटॅग अभियानाद्वारे या सुपरमॅनवर जोरदार टीका व्हायला लागली आहे.
एवढेच नव्हे तर डिसी कॉमिक्सच्या प्रत्येक सिनेमावर बहिष्कार घालण्याची मागणी व्हायला लागली आहे. “इनसाईट’मध्ये काश्मीरला हत्यारमुक्त क्षेत्र म्हणून दाखवले गेले आहे. या ऍनिमेशनपटातील एक व्हिडीओदेखील खूप व्हायरल व्हायला लागला आहे.
यामध्ये काश्मीरला हत्यारमुक्त क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात यावे, असे सुपरमॅन वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगताना दिसतो आहे. एवढेच नव्हे तर सुपरमॅन आणि वंडरवुमन काश्मीरमध्ये फायटर प्लेनमधून बॉम्बवर्षाव करताना आणि पॅरेशूटद्वारे कमांडो उतरवतानाही दिसत आहेत.
मात्र हा विषय भारताच्या अजेंड्याविरोधात आहे, अशी टीका व्हायला लागली आहे. काश्मीरबाबतचा इतिहास डिसी कॉमिक्सने अगोदर अभ्यासला पाहिजे, असेही म्हटले जाऊ लागले आहे