पुणे – “कोवोवॅक्स’ या करोना प्रतिबंधक लसीच्या मानवी चाचणीसाठी आता 2 ते 6 वर्षांच्या मुलांच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सीरम कंपनीकडून ही लस तयार करण्यात आली असून, पुण्यात दोन ठिकाणी दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यांसाठी ही चाचणी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
सीरम कंपनीने 18 वर्षापुढील व्यक्तींसाठी “कोविशिल्ड’ ही लस बाजारात आणली. त्यानंतर 18 वर्षांखालील मुलांच्या लसीकरणाचा प्रश्न उपस्थित झाला. अमेरिकेतील “नोवोवॅक्स’ कंपनीच्या या लसीची सीरम इन्स्टिट्यूटने “कोवोवॅक्स’ नावाने लसनिर्मिती सुरू केली आहे.
आता पुण्यासह देशात विविध केंद्रांवर 2 ते 17 वर्षापर्यंतच्या बालकांवर लसीची चाचणी सुरू आहे. आतापर्यंत 12 ते 17 वयोगटातील बालकांवर लस चाचणीचा एक टप्पा पूर्ण झाला आहे. देशभरात सुमारे 920 मुलांवर लसीची चाचणी करण्याचे नियोजन आहे.
लहान मुलांवरील कोवोवॅक्स या लसीच्या चाचणीची दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. त्या टप्प्यांतर्गत 2 ते 11 या वर्षातील बालकांची नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यात दोन टप्पे आहेत. दोन ते सहा आणि 7 ते 11 या वयातील बालकांचा त्यात समावेश आहे. दोन्ही टप्प्यांत लसीची परिणामकारकता आणि सुरक्षितता तपासण्यात येणार आहे, अशी माहिती भारती रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली. दरम्यान, या चाचणीचे परिणाम आरोग्य विभागाकडे सुपूर्द केले जाणार आहेत.